करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भीतीने महानगरांमधून आपल्या गावी जाणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढले आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरांतील रेल्वे स्टेशन्सवर प्रचंड गर्दी उसळली आहे. अशा जनतेला संबोधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन टि्वट केले आहेत. “जिथे आहात तिथेच थांबा, प्रवास करून जीव धोक्यात घालू नका,” असं त्यांनी टि्वटमध्ये म्हटलंय.

मोदी यांनी टि्वटमध्ये म्हटलंय की, “करोना व्हायरसची लागण होईल या भीतीने अनेक लोक सध्या जिथं पोटापाण्यासाठी नोकरी करण्यासाठी गेले आहेत, तिथून गावी परतू लागले आहेत. गर्दीत प्रवास केल्याने करोनाची लागण होण्याची शक्यता वाढते आहे. तुम्ही जिथे जात आहात तिथल्या लोकांसाठीही धोका वाढणार आहे. त्यामुळे तुमचं गाव आणि कुटुंबाच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.”

दुसऱ्या टि्वटमध्ये मोदी यांनी म्हटलंय की, “तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की, कृपया तुम्ही ज्या शहरात आहात तिथेच राहा. त्यातूनच आपण करोना व्हायरसचा फैलाव होण्यापासून रोखू शकतो. रेल्वे स्टेशन्स, बस स्थानकांवर गर्दी करून आपण आपल्या आरोग्याशीच खेळत आहोत. कृपया स्वतःची आणि आपल्या परिवारच्या चिंता करा. आवश्यकता नसेल तर घराच्या बाहेर पडू नका.”

मोदी यांनी गुरुवारी सायंकाळी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्याला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. अनेक शहरांमधील दुकाने बंद आहेत. रस्त्यांवर लोकांची गर्दीही कमी झाली आहे.