पीटीआय, बर्लिन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांतील व्यावसायिक व सांस्कृतिक संबंधांना चालना देण्यासह विविध क्षेत्रांतील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेही यावेळी उपस्थित होते.
मोदींचे सोमवारी सकाळी बर्लिनमध्ये आगमन झाले. त्यांच्या या युरोप दौऱ्यादरम्यान ते डेन्मार्क, फ्रान्सचाही दौरा करणार आहेत. युक्रेन संघर्षांमुळे रशियाविरुद्ध अवघे युरोपीय देश एकत्र आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा होत आहे. सोमवारी मोदींचे ओलाफ स्कोल्झ यांनी बर्लिन येथील ‘फेडरल चान्सलरी’च्या प्रासादात स्वागत केले. येथील प्रांगणात त्यांना लष्करी सलामी देण्यात आली. उभय पक्षांच्या शिष्टमंडळांच्या चर्चेआधी दोन्ही नेत्यांत अल्पकाळ चर्चा झाली.
‘पंतप्रधान मोदी व चान्सलर स्कोल्झ यांच्या भेटीमुळे भारत आणि जर्मनी सहकार्याचा विस्तार होत आहे.’ अशा आशयाचे ट्वीट पंतप्रधान कार्यालयातर्फे करण्यात आले. मोदींचा हा पाचवा जर्मनी दौरा आहे. एप्रिल २०१८, जुलै २०१७, मे २०१७ व एप्रिल २०१५ मध्ये मोदींनी जर्मनी दौरे केले होते. डिसेंबर २०२१ मध्ये जर्मन चान्सलरपदाची सूत्रे घेतल्यानंतर प्रथमच मोदी त्यांची भेट घेत आहेत. बर्लिनमध्ये दोन्ही नेत्यांत विविध विषयांवर चर्चा होणार आहे. परस्पर व्यापारी संबंध दृढ व्हावेत, सांस्कृतिक देवाण-घेवाणीस चालना मिळावी, हा त्यामागील हेतू आहे. जागतिक स्तरांवर होत असलेल्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक आणि व्यूहात्मक संबंधांवर दोन्ही नेते विचारविनिमय करणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अिरदम बागची यांनी सांगितले.
२०११ मध्ये अस्तित्वात आलेल्या ‘सहाव्या भारत-जर्मनी इंटर गव्हर्नमेंटल कन्सल्टेशन्स’चे (आयजीसी) अध्यक्षपद मोदी आणि स्कोल्झ संयुक्तरित्या भूषवणार आहेत. या द्विपक्षीय उपक्रमाद्वारे दोन्ही देशांच्या सरकारमधील विविध क्षेत्रांतील संबंधांचा विस्ताराने आढावा घेण्यात येईल. यात दोन्ही देशांचे अनेक मंत्रीही सहभागी होणार आहेत.
जर्मनीला रवाना होण्यापूर्वी मोदींनी सांगितले, की स्कोल्झ हे जर्मनीचे व्हाईस चान्सलर व अर्थमंत्रिपदी असताना ‘जी २०’ देशांच्या परिषदेत आपली त्यांची भेट झाली होती. या दौऱ्यात द्विपक्षीय संबंधांवर विस्ताराने चर्चा करून ते दृढ करण्यावर आपला भर असेल. दोन्ही देशांना प्रादेशिक, व्यूहात्मक आणि जागतिक पातळीवरील समस्यांवरही आमच्या चर्चेत भर राहील. २०२१ मध्ये भारत आणि जर्मनीदरम्यानच्या राजकीय संबंधांची ७० वर्षे साजरी करण्यात आली. दोन्ही देशांत २००० पासून परस्परांशी व्यूहात्मक संबंध आहेत. जर्मनी आणि भारतादरम्यान व्यापारांत सुमारे २१ अब्ज डॉलरची उलाढाल होते. मोदी जर्मनीत स्थायिक भारतीयांशीही संवाद साधणार आहेत.