भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यास ते देशाचे विभाजन करतील, अशी टीका भारतीय मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचारजी यांनी मंगळवारी केली.  मोदी हे उद्योगपतींनी पुढे केलेला पंतप्रधानपदाचा उमेदवार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मोदी सत्तेवर आल्यास देशाचे विभाजन होईल आणि ते आपल्यासाठी अधिक धोकादायक आहे. मोदींना गुजरातमधील गरीब जनता आणि शेतकऱ्यांनी पुढे केलेले नाही तर देशातील मोजक्या उद्योगपतींनी त्यांना पुढे केले आहे. उद्योगपतींची रणनीती धोकादायक असल्याचे बुद्धदेव यांनी एका सभेत बोलताना सांगितले.
ते पुढे म्हणाले की, तृणमूल कॉंग्रेस आणि भाजप सत्तेसाठी छुपी आघाडी करतात. ही गोष्ट नवी नाही, याआधीही या दोन्ही पक्षांनी आघाडी केल्याचे दिसून आले आहे.
केंद्रातील सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीनंतर विद्यमान यूपीए सरकार आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जनताविरोधी धोरणे राबविल्याबद्दल सत्तेवरून जावे लागणार आहे. लोकांच्या विरोधी निर्णय घेतल्यामुळे मनमोहन सरकारची अवस्था बिकट झाली आहे, असेही बुद्धदेव म्हणाले.