देशाला काँग्रेसपासून मुक्ती द्या, असे आवाहन करत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर चौफेर टीकास्त्र सोडले. काँग्रेस पक्षाने भ्रष्टाचाराची नवी बाराखडी तयार केल्याचे सांगत त्याची खिल्ली उडवली. सुराज्य संकल्प यात्रेचा समारोप मोदींच्या सभेने झाला.
मोदी यांनी भाषणात पंतप्रधान मनमोहन सिंग आणि गांधी कुटुंबियांवर जोरदार टीका केली. काँग्रेस पक्षाकडे नेतृत्व करण्याची क्षमता नाही, महत्त्वाचे निर्णय ते घेऊ शकत नाहीत आणि कुणालाही उत्तरदायित्व नसल्याचा आरोप मोदींनी केला. काँग्रेसने भ्रष्टाचाराची नवी बाराखडी तयार केल्याचा आरोप मोदींनी केला. यात ए म्हणजे आदर्श घोटाळा, बी म्हणजे बोफोर्स, सी म्हणजे कोळसा खाण घोटाळा अशी ही बाराखडी  म्हणजे एका मागे एक घोटाळ्यांमध्ये मालिकाच असल्याचे मोदींनी सांगितले. भ्रष्टाचार ही काँग्रेसची देणगीच आहे. जी व्यक्ती जास्त घोटाळे करते त्याला बढती मिळते अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. देश जर भ्रष्टाचार मुक्त करायचा असेल तर काँग्रेसला हटवा असे आवाहन मोदींनी केले.
स्वातंत्र्यापूर्वीची आणि आताची काँग्रेस यात मोठा फरक आहे. आताची काँग्रेसमध्ये एका कुटुंबाचे गुणगान सुरू आहे. भाजप मात्र एका कुटुंबाची मालमत्ता नाही तर देशभक्तीला प्राधान्य देतो असा दावा मोदींनी केला. जी-२० परिषदेत पंतप्रधानांनी देशाची काय भूमिका मांडली असा सवाल मोदींनी केला. मायदेशी परतल्यावर त्यांनी भावी पंतप्रधान म्हणून राहुल गांधी यांचे नाव पुढे करण्याचेच काम केले. आता त्यांच्या नेतृत्वाखाली मनमोहन सिंग काम करण्यासाठी तयार आहेत असा टोला मोदींनी राहुल यांचे नाव न घेता लगावला.

Story img Loader