माझ्या मुलाचा मृत्यू झाला पण अन्य पालकांनी त्यांच्या मुलांना लष्करात पाठवायचे थांबवले तर मग देशासाठी कोण लढेल ? हे उदगार आहेत मोहोम्मह हनीफ यांचे. हनीफ यांचा चौथा मुलगा औरंगजेब लष्करी सेवेत होता. ईदच्या सुट्टीसाठी औरंगजेब गुरुवारी घरी येत असताना वाटेतच दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण करुन हत्या केली. मुलाच्या मृत्यूनंतरही मोहोम्मद हनीफ खचले नसून आपल्या विचारातून त्यांनी इतरांसमोर एक आदर्श ठेवला आहे.
एक दिवस मृत्यू येणारच आहे. मी देशसेवा करण्यासाठी माझ्या मुलाला लष्करामध्ये भरती केले होते. शत्रूला मारणे किंवा मरणे हे सैनिकाचे काम असते असे मोहोम्मद हनीफ म्हणाले. मोहोम्मद हनीफ यांचा मोठा परिवार असून त्यांना एकूण १० मुले आहेत. औरंगजेब चौथे अपत्य होते. हनीफ यांचा मोठा मुलगा मोहोम्मद कासीम लष्करात असून त्यांची दोन लहान मुले मोहोम्मद तारीक आणि मोहम्मद शब्बीरही लवकरच लष्कराच्या सेवेत दाखल होणार आहेत.
दरम्यान मोहोम्मद हनीफ यांनी पुढच्या ३२ तासात माझ्या मुलाच्या मृत्यूचा बदला घ्या अशी मागणी केली आहे. औरंगजेबचे वडिल मोहोम्मद हनीफ यांचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यांनी आपल्या मुलाच्या हत्येसाठी पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना जबाबदार धरले आहे. जे दहशतवादी माझ्या मुलाच्या हत्येमध्ये सहभागी आहेत त्यांचा पुढच्या ३२ तासांच्या आत खात्मा करुन बदला घ्या अशी मागणी त्यांनी केली आहे.
जे काश्मीरला लुटत आहेत त्यांना संपवले पाहिजे. काश्मीर आपले असून काश्मीरला जळण्यापासून रोखले पाहिजे. जे काश्मीरचे नुकसान करत आहेत त्यांना संपवले पाहिजे असे मोहोम्मद हनीफ म्हणाले. माझा मुलगा देशासाठी बलिदान देऊन माझ्याकडे परत आला आहे. त्याने त्याचा शब्द पाळला असे मोहोम्मद हनीफ म्हणाले. काश्मीर खोऱ्यातील खतरनाक दहशतवादी समीर टायगर आणि अन्य चकमकींमध्ये औरंगजेब सहभागी होता.