टांझानियातील प्रमुख शहर दार एस सलाम येथे आफ्रिकेतील सर्वात युवा अब्जाधीश अशी ओळख असलेल्या भारतीय मूळच्या मोहम्मद देवजी यांचं अपहरण करण्यात आलं आहे. पोलिसांनी गुरूवारी याबाबत माहिती दिली. बीबीसीच्या वृत्तानुसार, 43 वर्षीय देवजी सकाळी नेहमीच्या व्यायामासाठी हॉटेलच्या जिममध्ये जात होते. हॉटेलच्या जिममध्ये जात असताना त्यांचं अपहरण करण्यात आलं.
अपहरणकर्ते कारमधून आले होते, देवजी यांचं अपहरण करण्यापूर्वी अपहरणकर्त्यांनी हवेत गोळीबार केला. आम्ही हॉटेलमधील आणि जिममधील कर्मचाऱ्यांची चौकशी करत आहोत असं दार एस सलामचे पोलीस आयुक्त लॅझरो मांबोसासो यांनी सीएनएनशी बोलताना सांगितलं. अपहरणकर्ते परदेशी नागरिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपहरकर्त्यांसाठी जिमच्या दिशेकडील गेट जाणूनबुजून उघडे ठेवण्यात आले होते अशीही शंका व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाशी संबंधित तीन जणांना अटक करण्यात आल्याचीही माहिती आहे.
जगप्रसीद्ध फोर्ब्स मासिकाने मोहम्मद देवजी यांची संपत्ती 1.5 अब्ज डॉलर असल्याचं जाहीर केलं होतं. तसंच टांझानियातील एकमेव अब्जाधीश असल्याचीही घोषणा केली होती. 2017 सालच्या एका रिपोर्टमध्ये फोर्ब्सने देवजी हे आफ्रिकेतील सर्वात युवा अब्जाधीश असल्याचं म्हटलं होतं. गोरगरिबांच्या मदतीसाठी किमान अर्धी संपत्ती दान करेल अशी घोषणा 2016 साली देवजी यांनी केली होती.