Mohan Bhagwat : पहलागम या ठिकाणी २२ एप्रिलला झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांना त्यांचा जीव गमावावा लागला. यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. जगभरातून या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला. दरम्यान सरसंघचालक मोहन भागवत यांनी या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हटलं आहे मोहन भागवत यांनी?
अहिंसा हा भारताचा धर्म आहे, भारतीय मूल्यांचा एक अविभाज्य घटक आहे. पण दहशतवादी, अत्याचारी, गुंड लोकांना धडा शिकवणंही आवश्यक आहे. रावणाचा वध त्याचा नायनाट करण्यासासाठी नाही तर त्याच्या भल्यासाठी केला गेला होता असंही उदाहरण यावेळी मोहन भागवत यांनी दिली. द हिंदू मेनिफेस्टो नावाच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं. हा सोहळा दिल्ली या ठिकाणी पार पडला.
अहिंसा हे भारताचं मूल्य आहे, पण…
“अहिंसा हे भारताचं मूल्य आहे. भारताचा तो विचार आहे. आपली अहिंसा लोकांना अहिंसक करण्यासाठी आहे. काही लोक अहिंसक होतील पण काही जण नाही बनणार नाही. तुम्ही काहीही करा त्यांना अहिंसक व्हायचं नसेल असेच हे असतील. तसंच तुम्हालाच नाही तर सगळ्या जगाला उपद्रव करतील. रावणाचा वध त्याच्या कल्याणासाठी झाला आहे. शिवभक्त रावण, वेद माहित असणारा, उत्तम प्रशासक रावण. असे चांगले गुण रावणाकडे होतेच. पण त्याने जे शरीर, मन बुद्धी स्वीकारली त्यामुळे या चांगले गुण त्याच्यात येऊ दिले नाहीत. त्यामुळे ते शरीर, मन, बुद्धी संपवली गेली. त्यामुळेच रावणाचा संहार केला. रावणाचा संहार म्हणजे हिंसा नाही ती अहिंसाच आहे. अहिंसा आपला धर्म आहे. पण आततायी लोकांकडून मार न खाणं आणि गुंडगिरी करणाऱ्यांना धडा शिकवणं हादेखील आपला धर्म आहे. पाश्चिमात्य विचारसरणीत या दोन्ही गोष्टी एकसंधपणे चालत नाहीत. माझा शत्रू असेल तरीही मी हे पाहिन की तो चांगला आहे की वाईट. पण तो समतोल तिथे नाही शत्रू म्हटलं की त्याला संपवा मग तो चांगला असो की वाईट. आपल्याकडे शत्रू चांगला आहे की वाईट ते पाहिलं जातं. त्यामुळे त्यांचं कल्याण व्हावं म्हणून शिक्षा देऊन आपण त्यांना सोडतो. आपण समतोल राखतो.”
आपण शेजारी राष्ट्रांचा अपमान करत नाही-मोहन भागवत
“आपण कधीही शेजारी राष्ट्रांचा अपमान करत नाही, त्यांना हानी पोहचवली जाईल असं कृत्य करत नाही. तरीही कुणी वाईटपणानेच वागणार असेल तर दुसरा इलाज काय? राजाचं कर्तव्य आहे प्रजेचं रक्षण करणं. गीतेमध्ये अहिंसेचा उपदेश आहे. तो उपदेश अशासाठी करण्यात आला की अर्जुनाने लढावं आणि शत्रूला मारावं. कारण त्यावेळी असे लोक अर्जुनासमोर होते ज्यांचा विकासासाठी वेगळा मार्गच उरला नव्हता. संतुलन ठेवणारी भूमिका आपली आहे. आपणही ते संतुलन विसरलो आहे. संतुलित ठेवणारा आपला धर्म आहे.” असं म्हणत मोहन भागवत यांनी पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे.