विकास पाठक, एक्स्प्रेस वृत्त

नवी दिल्ली: अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत आहे. या निमित्ताने कटुता, वाद आणि संघर्ष संपायला हवा असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. हा वाद संपायला हवा हे समाजाने पाहायला हवे, असे भागवत यांनी विशेष लेखात नमूद केले आहे.

अयोध्या म्हणजे ज्या शहरात युद्ध नसेल, संघर्षांपासून ते मुक्त असेल. भारतवर्षांच्या पुनर्उभारणीच्या मोहिमेची ही सुरुवात आहे. स्वातंत्र्यानंतर सोमनाथ मंदिराचा एकमताने जीर्णोद्धार करण्यात आला. त्याच वेळी अशा मंदिरांबाबत चर्चा सुरू झाली. अशीच सहमती राम जन्मभूमीबाबत विचारात घेता आली असती. मात्र तुष्टीकरणाचे राजकारण आडवे आल्याची टीका सरसंघचालकांनी केली. राजकारणाची दिशा बदलली, भेदभाव, तुष्टीकरणाचे राजकारण प्रचलित झाले. यातून हा प्रश्न प्रलंबित राहिला.

या मुद्दयावर विविध सरकारांनी हिंदू समाजाच्या भावनाही विचारात घेतल्या नाहीत. उलट समाजाने याबाबत जे प्रयत्न चालवले होते तेच हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. याबाबतची कायदेशीर लढाई स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू आहे. राम जन्मभूमीमुक्तीसाठी जनचळवळ ही १९८० मध्ये सुरू झाली ती ३० वर्षे चालल्याचे भागवत यांनी स्पष्ट केले. आपल्या भारताचा इतिहास हा परकीय आक्रमकांविरोधातील दीड हजार वर्षांच्या संघर्षांचा आहे. इस्लामच्या नावाखाली पश्चिमेकडून जे हल्ले झाले त्यात मंदिरांचा पूर्णपणे विध्वंस झाला तसेच समाजात दुरावलेपण आले. राष्ट्र आणि समाज यांचे खच्चीकरण करायचे असेल तर त्यांची धार्मिक स्थळे नष्ट करणे गरजेचे होते. त्यासाठी परकीय आक्रमकांनी भारतात मंदिरे नष्ट केली. हे केवळ एकदाच नव्हे, तर अनेकदा त्यांनी केले. भारतीय समाजातील नैतिक धैर्य कमी करून त्यांच्यावर राज्य करता येईल अशी त्यांची धारणा होती असे भागवत यांनी लेखात नमूद केले आहे. अयोध्येत राम मंदिराबाबतही हेच करण्यात आले.

या धोरणाला यश आले नाही. भारतात श्रद्धा, वचनबद्धता तसेच नैतिकता ढळणार नाही. त्यांचा संघर्ष सुरूच राहिला. यातून मंदिर, जन्मस्थान ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरूच राहिले. त्यासाठी अनेकदा युद्ध झाले, बलिदान दिले. यामुळे राम जन्मभूमीचा मुद्दा हिंदू समाजाच्या मनात कायम होता. ब्रिटिशांशी १९५७ मध्ये हिंदू तसेच मुस्लिमांनी एकत्रित संघर्ष केला याची आठवण सरसंघचालकांनी करून दिली. गोहत्या बंदी तसेच राम जन्मभूमी मुक्तीद्वारे उभय समाजात सलोख्याची संधी होती. बहादूर शाह जफरने गोहत्या बंदीची हमी दिली होती. यातून सारे एकत्र लढले. युद्धात भारतीयांनी अतुलनीय शौर्य दाखवले. दुर्दैवाने हे स्वातंत्र्ययुद्ध अपयशी ठरले. ब्रिटिश राजवट कायम राहिली मात्र राम मंदिरासाठीचा संघर्ष सुरूच राहिला असे भागवत यांनी स्पष्ट केले. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीने राष्ट्रीय अभिमान जागृत झाला आहे. दैनंदिन जीवनात रामाची मूल्ये आचरणात आणा. प्रामाणिकपणा, क्षमाशीलता, सामर्थ्य आणि शौर्य, खरेपणा आणि मानवतावाद, प्रत्येकाशी वर्तनात करुणा आणि सेवा, हृदयाचा मृदुपणा आणि स्वत:ची कर्तव्ये पार पाडताना स्वत:विषयी कठोर बाणा हे सर्व श्रीरामाचे गुणधर्म आहेत, त्याचे सर्वांनी आचरण करावे असे आवाहन त्यांनी केले.

Story img Loader