राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरींनी टीका केली आहे. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे मुख्यालय आहे त्यावर तुम्ही तिरंगा कधी फडकवणार आहात ते सांगा असा सवाल चौधरी यांनी मोहन भागवत यांना विचारला आहे. अधीर रंजन चौधरी यांनी हा आरोपही केला आहे की जेव्हा ब्रिटिशांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी स्वातंत्र्य संग्राम सुरु होता त्या दरम्यान RSS ने ब्रिटिशांची दलाली केली होती.
अधीर रंजन चौधरी काय म्हणाले?
“नागपूरच्या संघ मुख्यालयावर तिरंगा कधी फडकवणार हे मोहन भागवत यांनी सांगावं. सगळ्यांना माहित आहे असं कधीच होणार नाही. जेव्हापासून आपला देश स्वतंत्र झाला आहे तेव्हापासून भारताचं भगवीकरण झालं पाहिजे हेच संघाला वाटतं. तिरंगा त्यांच्या संघटनेच्या आणि पक्षाच्या विचारधारेच्या बाहेर आहे.”
RSS ने स्वातंत्र्य लढ्यात कघीच सहभाग घेतला नाही
RSS ने कधीच स्वातंत्र्य लढ्यात कधीही सहभाग घेतला नाही. या लोकांनी (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) ब्रिटिशांची दलाली केली होती. देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यात RSS शी संबंधित एकही नाव नाही.
मोहन भागवत यांनी काय दिलं उत्तर?
मोहन भागवत बुधवारी नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलत होते त्यावेळी संघ मुख्यालयावर तिरंगा का फडकवला जात नाही? या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. या प्रश्नाचं उत्तर देताना मोहन भागवत यांनी एक किस्सा सांगितला होता. एवढंच नाही तर आम्ही दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी तिरंगाच फडकवतो असंही त्यांनी सांगितलं.
मोहन भागवत यांनी काय किस्सा सांगितला?
कायमच हा प्रश्न विचारण्यात येतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भगवा झेंडा फडकवतो मात्र तिरंगा नाही. आज मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की तिरंगा झेंडा जन्माला आला तेव्हापासून संघ त्या झेंड्यासह ठामपणे उभा आहे. जेव्हा आपल्या देशाचा ध्वज तिरंगा असेल हे निश्चित झालं तेव्हा काँग्रेस हा एकमेव पक्ष होता. १९३३ मध्ये जळगावच्या जवळ एक अधिवेशन झालं. त्यावेळी उभारण्यात आलेला ध्वजस्तंभ ८० फूट होता. पंडित जवाहरलाल नेहरू हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. पंडित नेहरुंनी ध्वज फडकवण्यासाठी जेव्हा दोरी ओढली तेव्हा तो ध्वज ८० फूट वर गेला नाही, मधे लटकू लागला. एवढ्या उंचीवर जाऊन तो गुंता सोडवण्याचं धाडस कुणामध्येच नव्हतं. तेवढ्यात गर्दीतून एक तरूण आला, सरसर खांबावर चढला आणि त्याने गुंता सोडवला. ज्यामुळे तो ध्वज ८० फूट उंचीवर जाऊन फडकला. ही घटना घडल्यानंतर त्या तरुणाला लोकांनी पंडित नेहरुंकडे नेलं.
हे पण वाचा- “मोहन भागवत यांचं आरक्षणाविषयीचं वक्तव्य फसवं आणि दिशाभूल करणारं, तुम्ही संघात…?”, काँग्रेसचा सवाल
पंडित नेहरू यांनी त्याचं कौतुक केलं, त्या तरूणाची पाठ थोपटली. त्या तरूणाला पंडित नेहरूंनी अधिवेशनात बोलावलं तुझं अभिनंदन करू, सत्कार करू. त्यावेळी पंडित नेहरूंना काही लोकांनी सांगितलं की त्याला बोलवू नका तो शाखेत जातो. जळगावातल्या फैजपूरमध्ये राहणारे किसनसिंग राजपूत नावाचे ते स्वयंसेवक होते. पाच-सहा वर्षांपूर्वी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. डॉ. हेडगेवार यांना जेव्हा ही बाब कळली तेव्हा ते स्वतः जळगावला गेले त्यांनी राजपूत यांना चांदीची छोटीशी लोटी भेट म्हणून दिली.
पहिल्यांदा तिरंगा फडकवला गेला तेव्हापासून स्वयंसेवक तिरंग्याशी जोडला गेला आहे. त्यावेळी तर तिरंग्यावर चरखा होता अशोकचक्रही नव्हतं. पहिल्यांदा म्हणजेच १९३१ मध्ये काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याचा प्रस्ताव मंजूर केला तेव्हा डॉ. हेडगेवार यांनी संघाला संचलन काढण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी स्वयंसेवकांच्या हाती तिरंगाच होता. त्याद्वारे अभिनंदन प्रस्ताव हा काँग्रेसला पाठवला गेला अशीही आठवण मोहन भागवत यांनी सांगितली.