लोकसभा निवडणुकीबरोबरच ओडिशा विधानसभेची निवडणूकही पार पडली होती. या निवडणुकीत भाजपाने १४७ पैकी ७८ जागा जिंकत विजय मिळवला होता. त्यानंतर ओडिशाच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळात पडेल याकडे सर्वाचं लक्ष्य लागलं होते.
दरम्यान, आता भाजपाकडून ओडिशाच्या मुख्यमंत्री पदासाठी मोहन माझी यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे मोहन मांझी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. मंगळवारी भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी मोहन माझी यांची एकमताने निवड करण्यात आली.
कोण आहेत मोहन माझी?
मोहन माझी हे सलग चार वेळा आमदार राहिले आहेत. ते आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते केओंझर मतदारसंघातून निवडून आले. त्यांनी बीजेडीच्या मीना माझी यांचा ११ हजार ५७७ मतांनी पराभव केला.
उपमुख्यमंत्री पदासाठी दोघांची नावे जाहीर
मोहन माझी यांच्याशिवाय ओडिशांमध्ये दोन उपमुख्यमंत्री देखील असणार आहेत. उपमुख्यमंत्री पदासाठी भाजपाकडून सहा वेळा आमदार राहिलेले ज्येष्ठ नेते के.व्ही. सिंहदेव तसेच प्रवती परिदा यांचे नाव जाहीर करण्यात आलं आहे. प्रवती परिदा यांना पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. तसेच त्या भाजपाच्या प्रवक्त्यादेखील आहेत.
हेही वाचा – लोकसभेच्या निकालानंतर ठाकरे-भाजपाचं मनोमिलन? चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे तर्कवितर्कांना उधाण
दरम्यान, भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर भाजपाकडून ही नावे जाहीर करण्यात आली आहेत. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव निरीक्षक म्हणून उपस्थित होते. भाजपाचे सर्व ज्येष्ठ नेते आणि नवनिर्वाचित आमदारांशी चर्चा करून त्यांनी ही नावे जाहीर केली आहेत.