Mohandas Pai On Devendra Fadnavis: इन्फोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांनी नुकतेच कर्नाटक सरकारवर जोरदार टीका केली आणि सरकारची धोरणे मागास असल्याचे म्हटले आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना महाराष्ट्राच्या आर्थिक धोरणांमधून धडा घेण्याचे आवाहन केले.
“आपले कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी मोफत योजना आणि सांप्रदायिक धोरणांपेक्षा महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाचा, विकासाचा, गुंतवणुकीच्या धोरणांचा अभ्यास करावा आणि कर्नाटकला एक उत्तम भविष्य द्यावे. कर्नाटकसाठी आमच्या मुख्यमंत्र्यांचा दृष्टिकोन मागासलेला आहे, आपल्या तरुणांना जो आवश्यक आहे तो नाही. याबद्दल खूप दुःख आहे”, असे मोहनदास पै यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
फडणवीस काय करतात ते पाहा…
मोहनदास पै यांनी पुढे कर्नाटकच्या आर्थिक दृष्टिकोनाची तुलना महाराष्ट्राच्या आक्रमक विकास धोरणांशी केली, यावेळी त्यांनी विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. “फडणवीस काय करत आहेत, त्यांचे विचार, त्यांची धोरणे, त्यांची दृष्टी आणि मुंबईतील गुंतवणूक पाहा आणि बेंगळुरूसाठी आमच्या सरकारच्या दृष्टीकोणाकडे पाहा. हे खूप दुःखद!”
दरम्यान, डिसेंबर २०२४ मध्ये, मोहनदास पै यांनी आरोप केला होता की, सिद्धरामय्या प्रशासन कर्नाटकने पाहिलेले “सर्वात भ्रष्ट सरकार” आहे. भारतवार्ता या पॉडकास्टवर बोलताना, त्यांनी राज्य सरकारवर आर्थिक गैरव्यवस्थापन, शिक्षण आणि कौशल्य विकासातील दीर्घकालीन गुंतवणुकीपेक्षा लोकप्रिय मोफत योजनांना प्राधान्य दिल्याचा आरोप केला होता. याबाबत बिझनेस टुडेने वृत्त दिले आहे.
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पानंतर पै यांची पोस्ट
महाराष्ट्रा सरकारने आगामी आर्थिक वर्षासाठी ७,००,०२० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यानंतर मोहनदास पै यांनी एक्सवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात औद्योगिक विस्तार, पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीवर भर देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी ४० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि ५० लाख रोजगार निर्माण करण्यासाठी नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले आहे.
कोण आहेत मोहनदास पै?
मोहनदास पै हे एक भारतीय उद्योजक आणि गुंतवणूकदार आहेत. त्यांना भारतीय तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठीही ओळखले जाते. त्यांनी इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी म्हणूनही काम केले आहे. इन्फोसिसमधील त्यांच्या कार्यकाळात, त्यांनी कंपनीच्या आर्थिक धोरणाला आणि वाढीला आकार देण्यात, महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.