Mohandas Pai On Freshers Salary In IT : अरिन कॅपिटलचे अध्यक्ष आणि इन्फोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांनी भारतातील आयटी क्षेत्रातील फ्रेशर्सना मिळणाऱ्या पगारावर जोरदार टीका केली आहे. आयटी इंडस्ट्री एकीकडे विक्रमी नफ्याची बढाई मारत उच्च अधिकाऱ्यांना जास्त पगार देत आहे, तर दुसरीकडे फ्रेशर्सचे शोषण करत असल्याचा आरोप मोहनदास पै यांनी केला आहे.

फ्रेशर्सचे शोषण

“ते फ्रेशर्सचे शोषण करत आहेत. हे खूप अनैतिक आहे. हे बरोबर नसून, उद्योगाच्या दृष्टिकोनाच्या विरुद्ध आहे”, असे मोहनदास पै यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी निदर्शनास आणून दिले की, सीईओंच्या पगारात मोठी वाढ झाली असली तरी, गेल्या दशकात फ्रेशर्सचा पगार मात्र तेवढाच राहिला आहे.

ते म्हणाले, “२०११ मध्ये वार्षिक ३.२५ लाख रुपये कमावणारे फ्रेशर्स आता २०२४ मध्येही फक्त ३.५०-३.७५ लाख रुपये कमावतात. १३ वर्षांत त्यांच्या पगारात फक्त १५% वाढ झाली. याउलट, गेल्या पाच वर्षांत सीईओंचे पगार ५०-६०% वाढले आहेत, तर उच्च स्तरावरील आयटी अधिकाऱ्यांचे सरासरी पगार १६०% वाढून वार्षिक ८४ कोटींवर पोहोचले आहेत.” दरम्यान मोहनदास पै यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या व्हिडिओ मुलाखतीमध्ये या सर्व प्रकरणावर भाष्य केले आहे.

सीईओंना ५०-६० कोटी देता पण…

“सात ते आठ वर्षांपूर्वी ८-१० कोटी रुपये पगार मिळवणाऱ्या सीईओंना तुम्हा आता ५०, ६०, ७० कोटी रुपये देता. पण तुम्हाला फ्रेशर्सना पैसे द्यायचे नाहीत? मला वाटते की हे भयानक आहे. देशाचे नेतृत्व करण्याऱ्या उद्योगाचा हा मार्ग नाही,” असे पै यांनी पुढे म्हटले आहे. त्यांनी पुढे असा युक्तिवाद केला की इंडस्ट्री गेल्या दशकाहून अधिक काळापासून फ्रेशर्सचे शोषण करत आहे, स्थिर वेतनाचा परिणाम खालच्या ५०% कर्मचाऱ्यांवर होत आहे.

कोण आहेत मोहनदास पै?

मोहनदास पै हे एक भारतीय उद्योजक आणि गुंतवणूकदार आहेत. त्यांना भारतीय तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठीही ओळखले जाते. त्यांनी इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी म्हणूनही काम केले आहे. इन्फोसिसमधील त्यांच्या कार्यकाळात, त्यांनी कंपनीच्या आर्थिक धोरणाला आणि वाढीला आकार देण्यात, महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

इन्फोसिसमधील त्यांच्या कार्यकाळानंतर, मोहनदास पै विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात. ज्यात स्टार्ट-अप्समध्ये गुंतवणूक करणे, शैक्षणिक उपक्रमांना पाठिंबा देणे आणि सामाजिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे यांचा समावेश आहे.

Story img Loader