* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांचे यश
* स्मार्ट गार्मेटचा जमाना
सध्या स्त्रिया व मुलींची धोक्यात आलेली सुरक्षितता त्यातच वाढत असलेल्या बलात्काराच्या घटना या पाश्र्वभूमीवर तंत्रज्ञानाचा वापर करून या गुन्हय़ांना आळा घालण्यासाठी स्मार्ट गारमेंट तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात विशेष करून वस्त्रप्रावरणातच अशा यांत्रिक सुविधा वापरल्या जातात जेणेकरून गैरकृत्य करणाऱ्यांना विजेचा धक्का बसू शकेल किंवा त्यांची छबी टिपणारा कॅमेरा असेल. अशाच प्रकारचे सोसायटी हार्नेसिंग इक्विपमेंट म्हणजे ‘शी’ नावाचे अंतर्वस्त्र अभियांत्रिकीच्या काही तरुणींनी तयार केले आहे. आता नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या दोन विद्यार्थ्यांनी विनयभंग विरोधक जॅकेट तयार केले आहे. त्याला अजून पेटंट मिळणे बाकी आहे, पण ते इ.स. २०१४ पर्यंत विक्रीस उपलब्ध होणार आहे.
प्रा. नूपुर आनंद यांनी सांगितले, की स्टन गनची संकल्पना यात वापरली आहे. ही गन पोलिसांकडे असते व त्यातून ११० व्होल्टचे धक्के दिले जातात. त्यामुळे व्यक्ती अचल होते, त्याचा फायदा आम्ही मुलींना व स्त्रियांना करून देणार आहोत. निशांत प्रिया व शहजाद अहमद या आमच्या विद्यार्थ्यांनी अँटी मॉलेस्टेशन जॅकेट तयार केले आहे. त्यांनी पदवी कार्यक्रमांतर्गत दोन प्रकारची जॅकेट तयार केली असून, ही जॅकेट्स दिसायला काही वेगळी नसली तरी त्यांच्यात काही खास वैशिष्टय़े आहेत.
 बलात्काराच्या घटना वाढल्याने त्या कशा रोखता येतील, या विचारातूनच आम्हाला ही प्रेरणा मिळाली. नूपुर यांचीच ती मूळ कल्पना होती. २००४मध्ये अशीच काहीशी संकल्पना नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी वापरली होती. जर एखाद्या महिलेवर हल्ला झाला तर तिला त्या परिस्थितीतून सुटून बाहेर येता येईल असे वस्त्र तयार करण्याचा यात हेतू आहे असे निशांत प्रिया हिने सांगितले. स्वसरंक्षण जॅकेट तयार करण्यासाठी एका अभियंत्याचीही मदत घेण्यात आली आहे. या जॅकेटमध्ये अ‍ॅक्रिलिक व डेनीम यांची एम्ब्रॉयडरी आकर्षक पद्धतीने वापरली असून त्यात धातूचा काही भाग आहे. त्यामुळे विनयभंग करणाऱ्या व्यक्तींना १०० व्होल्टचा धक्का बसू शकतो. यात त्या मुलीने कमरपट्टय़ाला असलेले बटन दाबणे मात्र आवश्यक आहे. या जॅकेटमधील विद्युतभार हा धातूच्या संपर्कबिंदूवर येतो, त्यामुळे विजेचा धक्का देता येतो.
निशांत प्रिया हिने सांगितले, की हे जॅकेट उपयोगी असावे, त्याचबरोबर त्याची किंमतही परवडण्यासारखी असावी. यातील विद्युतप्रवाह कमी असतो अन्यथा त्याचे रूपांतर शस्त्रात होईल व त्याच्या वापरासाठी परवानगी घ्यावी लागेल, ते परिस्थिती टाळून हे जॅकेट किफायतशीर किमतीत तयार केले आहे. त्याचा वापर करून हल्लेखोराला १० ते १५ मिनिटे कुठलीही हालचाल करण्यापासून रोखता येते. प्रा. नूपुर आनंद यांनी अशा सुरक्षित कपडय़ांबाबत काही कल्पना मांडल्या आहेत, परंतु त्या प्रत्यक्षात यायच्या आहेत. त्या सांगतात, की प्रोक्युपाईन जॅकेट तयार करण्याची एक कल्पना आहे. यात हल्लेखोर जवळ आले तर जॅकेटवरील दाते (ब्रिसल्स) उभे राहतील. वास व ध्वनी यांच्या आधारेही महिलांच्या सुरक्षिततेसाठी कपडे तयार करणे शक्य आहे. यात कुणी त्या स्त्री किंवा मुलीच्या जवळ आले तर वेगळाच आवाज केला जाईल व तिखट असा वास सोडला जाईल, जेणेकरून हल्लेखोरांना पळून जाण्यावाचून गत्यंतर नसेल. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत अशा प्रकारचे विद्युत आधारित कपडे तयार करण्यात आले आहेत, पण ते व्यावसायिक पातळीवर भारतात उपलब्ध नाहीत. आम्ही जे कपडे तयार करू इच्छितो आहोत ते १५०० रुपये किमतीत उपलब्ध होतील असे असतील.
दिल्लीच्या शाळकरी विद्यार्थ्यांनी मनगटावर घडय़ाळासारखे लावता येईल असे यंत्र तयार केले आहे. त्यातही हल्लेखोराला हालचाली करता येणार नाहीत अशी स्थिती निर्माण केली जाते, त्यामुळे मदत मिळू शकते किंवा पळून जाण्यास वेळ मिळतो. विनयभंगविरोधी उपकरणाचा हल्लेखोराच्या त्वचेला स्पर्श झाला तर त्याला ०.१ अ‍ॅम्पीयरचा धक्का बसतो, तसेच इनबिल्ट कॅमेऱ्याने हल्लेखोराच्या प्रतिमाही घेता येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा