Monet Painting : नाझींनी ज्यू जोडप्याकडून लुटलेलं पेटिंग त्यांच्या कुटुंबांतील वंशजांना ८४ वर्षांनी एफबीआयने परत केलं आहे. Claude Monet या चित्रकाराचं पेस्टल शैलीतलं हे चित्र आहे. जे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी लुटण्यात आलं होतं.

नेमकी काय घटना घडली होती?

ॲडलबर्ट बेला आणि हिल्डा पार्लगी यांनी १९३६ मध्ये ऑस्ट्रिया या ठिकाणी झालेल्या चित्रांच्या एका लिलावात ‘बोर्ड डी मेर’ ही कलाकृती विकत घेतली होती. जर्मनीतल्या नाझी सैन्याने १९३८ मध्ये ऑस्ट्रियावर कब्जा केला. ज्यानंतर पालार्गींना पळून जावं लागलं होतं. ते स्वतःचं घरदार आणि संपत्ती तसंच सोडून जिवाच्या भीतीने पळाले होते. १९४० मध्ये ही नाझी सैन्याकडून ही मालमत्ता जप्त करण्यात आली. ज्यामध्ये या चित्रासह सात वेगवेगळ्या चित्रांचा समावेश होता. नाझी आर्ट डिलरने हे पेस्टल शैलीतलं चित्र विकत घेतलं. या चित्रावर १८६५ चं वर्ष लिहिलं आहे. मात्र हे चित्र १९४१ ला गायब झालं होतं असं FBI ने त्यांच्या पत्रकात लिहिलं आहे. बेला पार्लगी यांनी या चित्राचा शोध ते हयात असेपर्यंत म्हणजेच १९८१ पर्यंत सुरु ठेवला होता. १९८१ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हे चित्र चोरीला गेलं मात्र ते सापडलं नाही. त्यानंतर त्यांच्या मुलाने २०१२ पर्यंत या चित्राचा शोध घेतला, त्यासंदर्भातला पाठपुरावाही केला मात्र हा शोध लागला नाही. अखेर २०१२ मध्ये बेला पालर्गी यांच्या मुलाचाही मृत्यू झाला. मात्र या चित्राचा शोध लागला नाही.

FBI ने नेमकं काय केलं?

FBI ने या चित्रासंदर्भातला शोध सुरु केला. युरोपात याचा शोध सुरु होता. चोरलेल्या चित्रांसंदर्भात, कलाकृतींच्या संदर्भात नेमलेल्या आयोगाशी एफबीआयने संपर्क साधला. त्यावेळी त्यांना ही माहिती मिळाली की ऑलिर्न्स आर्ट डीलरने चोरीला गेलेलं ते चित्र २०१७ मध्ये विकत घेतलं होतं आणि त्यानंतर २०१९ मध्ये ते खासगी ग्राहकांना विकलं. यानंतर २०२३ मध्ये टेक्सासमधल्या ह्यूस्टन येथील एका कलादालनात हे चित्र लिलावासाठी ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली. ज्यानंतर FBI आणि शहर पोलिसांच्या गुप्तहेरांनी चित्राच्या मालकांशी संपर्क केला. या चित्राच्या मालकाला सदर चित्राबाबत नेमकं काय घडलं आहे ते कसं चोरीला गेलं हे ठाऊक नव्हतं. त्यांना FBI ने यासंदर्भातली सविस्तर माहिती दिली. सगळी घटना कळल्यानंतर मालकाने हे चित्र FBI च्या अधिकाऱ्यांना सुपुर्द केले आणि त्याची मालकी सोडली. त्यानंतर हे चित्र FBI ने पार्लगी यांची नातवंडं हेलन लोव आणि फ्रँकोइस पार्लगी यांना परत केलं.

ही कलाकृती अमूल्य आहे-FBI

हे चित्र प्रचंड मौल्यवान आहे तसंच पार्लगी कुटुंबासाठी हे चित्र म्हणजे वारसा जतन करण्यासारखं आहे. या चित्राची चोरी झाली होती. क्रूरपणे ते लुटण्यात आलं. त्याची किंमत डॉलर्समध्ये करता येणार नाही ते अमूल्य आहे असंही एफबीआयने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. ‘द गार्डियन’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.