पतंजलीच्या फसव्या जाहिरातींविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी सुनावणी करताना न्यायमूर्ती एहसानुद्दीन अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने पतंजली कंपनीला खडसावले आहे. दिशाभूल करणारे फसवे दावे बंद न केल्यास अशा प्रत्येक उत्पादनामागे एक कोटी रुपयांचा दंड ठोठावू, असा इशाराही सर्वोच्च न्यायालयाने योगगुरू बाबा रामदेव यांच्या या कंपनीला दिला. यावरून आता रामदेव बाबांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“पैसे सत्य आणि असत्य ठरवू शकत नाही. ॲलोपथीवाल्यांकडे भरपूर पैसे आहेत. त्यांच्याकडे रुग्णालये जास्त आहेत. त्यांच्याकडे जास्त डॉक्टर्स आहेत. त्यामुळे त्यांचा आवाज जास्त असू शकतो. पण आमच्याकडे ऋषींचा वारसा आहे. आम्ही दरिद्री नाही”, असं रामदेव बाबा म्हणाले.

“आमच्याकडे ज्ञान, विज्ञानाचे पुरावे आहेत.परंतु, आमची संख्या कमी आहे. गर्दीच्या आधारावर सत्य आणि खोटं ठरवलं जात नाही. आमची एकटी संस्था संपूर्ण जगातील मेडिकल माफिया, ड्रग्स माफियांविरोधात लढायला तयार आहे. पण स्वामी रामदेव कधी घाबरला नाही. आणि कधी हरला नाही. अंतिम निर्णयापर्यंत आम्ही या लढाईत लढू”, असंही ते ठामपणे म्हणाले.

हेही वाचा >> खोटे दावे करणाऱ्या उत्पादनावर एक कोटीचा दंड ठोठावू! पतंजलीच्या फसव्या जाहिरातींबाबत सर्वोच्च न्यायालयाचा इशारा

पतंजलीच्या फसव्या जाहिरातींविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती एहसानुद्दीन अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. काही विशिष्ट आजारांवर रामबाण इलाज असल्याचे दावे करणाऱ्या फसव्या जाहिरातींवर वचक बसवण्यासाठी उपाय शोधण्याची सूचना खंडपीठाने केंद्र सरकारची बाजू मांडणाऱ्या अतिरिक्त महान्यायअभिकर्ता के. एम. नटराज यांना केली. ‘आयएमए’ने केलेल्या याचिकेवर गेल्या वर्षी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद लि. सह केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालय तसेच आयुष मंत्रालयालाही नोटीस बजावली होती.

एवढंच नव्हे तर मंगळवारच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने पतंजलीशी संबंधित व्यक्तींना प्रसारमाध्यमांत नाहक विधाने करण्यास मज्जाव केला होता. ‘या वादाला आम्ही अ‍ॅलोपथी विरुद्ध आयुर्वेद असे स्वरूप देऊ इच्छित नाही. आम्हाला फसव्या जाहिरातींच्या समस्येवर उत्तर शोधायचे आहे,’ असेही खंडपीठाने स्पष्ट केले होते. परंतु, त्यानंतरही रामदेव बाबांनी अॅलोपथी उपचार पद्धतींवर टीका केली आहे.

Story img Loader