नारायण मूर्ती यांचा खुलासा
अरविंद केजरीवाल यांच्या नव्या राजकीय पक्षासाठी आपण कोणत्याही प्रकारे देणगी दिलेली नाही, असा खुलासा इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी मंगळवारी केला. टाटा समूहानेही सोमवारी याच प्रकारे खुलासा केला होता.
केजरीवाल यांच्या फाऊंडेशनला आपण अनेकदा मदत केली आहे, त्याची उद्दिष्टे निराळी होती, मात्र त्यांच्या राजकीय पक्षाला आपण अर्थसाहाय्य केलेले नाही, असे ते म्हणाले. माहितीच्या अधिकाराचा प्रभावी वापर करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे, यासाठी पुरस्कार देण्यासाठी केजरीवाल यांच्या फाऊंडेशनने २००८ मध्ये आमच्या कंपनीकडे आर्थिक मदत मागितली होती. त्यानुसार २००८, २००९ आणि २०११ या वर्षांसाठी प्रत्येकी २५ लाख तर २०१० या वर्षी ३७ लाखांचे धनादेश मी केजरीवाल यांना दिले. मात्र लोकपाल विधेयकाच्या मसुद्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने यंदा (२०११ मध्ये) हे पुरस्कार देता येणे शक्य नाही, हा निधी लोकपालाच्या कामासाठी खर्च केला तर चालेल का, अशी विचारणा केजरीवाल यांनी मला मे २०११ मध्ये एक पत्राद्वारे केली होती. देशाला सशक्त लोकपाल विधेयकाची गरज असल्याचे वाटल्याने मी त्यांना होकार दिला, मात्र त्यामागे त्यांच्या नव्या राजकीय पक्षाला सहकार्य करण्याचा हेतू नव्हता, असे मूर्ती यांनी स्पष्ट केले.  सरकारी दबावामुळेच टाटा आणि मूर्ती यांनी हे खुलासे केल्याचे मानले जात आहे.     

केजरीवाल यांच्या फाऊंडेशनला आपण अनेकदा मदत केली आहे, त्याची उद्दिष्टे निराळी होती, मात्र त्यांच्या राजकीय पक्षाला आपण अर्थसाहाय्य केलेले नाही – नारायण मूर्ती