घोटाळे करून देशाबाहेर पळालेले व्यावसायिक विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्याकडून २२,२८० कोटी रुपये ईडीद्वारे वसूल करण्यात आले आहेत, तसेच आर्थिक घोटाळे करणाऱ्या विरोधात यापुढेही कारवाई सुरूच राहिल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत सांगितले आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी पुरवणी मागण्यांची चर्चा लोकसभेत सुरू असताना त्यांनी सांगितले की, विजय मल्ल्याकडून १४,१३१.६ कोटी रुपयांची संपत्ती वसूल करून ती सार्वजनिक क्षेत्रातील बँकेला परत देण्यात आल्याची माहिती लोकसभेत दिली. तसेच नीरव मोदी यांच्या प्रकरणात १,०५२.५८ कोटी रुपये वसलू करण्यात आले आहेत.
ईडी आणि बँकांनी संयुक्तपणे विशेष न्यायालयाच्या माध्यमातून हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या विरोधात कारवाई केली. चोक्सी आणि मोदी यांनी एकत्रितपणे पंजाब नॅशनल बँकेची १३ हजार कोटींची फसवणूक केली होती. चोक्सीकडून २,५६६ कोटी रुपयांची संपत्ती वसूल करण्यात आली असून त्यांचा लिलाव करण्यात आला आहे, अशीही माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली.
हे वाचा >> गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंडाचा नवीन पर्याय, म्युच्युअल फंड लाईट काय आहे?
कुणालाही सोडले जाणार नाही – सीतारमण
निर्मला सीतारमण म्हणाल्या, “पीएमएलए कायद्यानुसार ईडीने आतापर्यंत २२,२८० कोटी रुपये वसूल केले आहेत. आम्ही कुणालाही सोडले नाही. भलेही ते देश सोडून पळाले असतील. पण आम्ही त्यांच्या मागे लागलो आहोत. ईडीने त्यांच्याकडून पैसा गोळा करून तो पुन्हा बँकात जमा केला आहे. आर्थिक घोटाळे करणाऱ्या एकाही आरोपीला आम्ही सोडणार नाही. आम्ही त्यांच्या मागावर राहणारच. जो पैसा बँकाचा आहे, तो बँकांना परत मिळालाच पाहीजे.”
विदेशात काळा पैसा जमा करणाऱ्यांच्या विरोधात काय कारवाई करणार? असा प्रश्न काही खासदारांनी विचारला होता. त्यावर अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या की, २०१५ साली काळा पैसा विरोधी कायदा लागू केला गेला. यातून अनेक करदात्यांवर प्रभाव पडला असून त्यांनी परदेशात असलेल्या संपत्तीची स्वतःहून माहिती दिली. विदेशातील संपत्ती उघड करणाऱ्यांची संख्या २०२१-२२ साली ६०,४६७ होती. ती आता २०२४-२५ साली वाढून दोन लाख झाली आहे.