पीटीआय, कोलकाता : ‘‘अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) छाप्यांमध्ये जप्त केलेले पैसे आपले नाहीत. या कटात आणखी कोणाचा सहभाग होता, याचा खुलासा योग्य वेळी होईल. आपल्याविरुद्ध कारस्थान रचले आहे,’’ असा दावा पश्चिम बंगालमधील शालेय भरती घोटाळय़ातील प्रमुख आरोपी व पदच्युत मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी रविवारी केला.
या प्रकरणी चॅटर्जी सध्या अटकेत आहेत. नियमित वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात आणले असताना, पत्रकारांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता, चॅटर्जी यांनी स्पष्ट केले, की जप्त केलेली रक्कम माझी नाही. आपल्याविरुद्ध कोणी कट रचत आहे का, असे पत्रकारांनी विचारले असता, वेळ आल्यावर कळेल, असा खुलासा चॅटर्जी यांनी केला.
चटर्जी यांनी शुक्रवारीही आपण एका कटाचा बळी असल्याचे सांगून तृणमूल काँग्रेसच्या निलंबनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी रविवारी सांगितले, की मला निलंबित करण्याच्या या निर्णयाचा निष्पक्षपाती तपासावर परिणाम होऊ शकतो. एकेकाळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निकटचे मंत्री असलेल्या चॅटर्जी यांनी मंत्रिपदावरून हटवण्याच्या ममता बॅनर्जी यांच्या निर्णय मात्र योग्य असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
६९ वर्षीय चॅटर्जी यांना विविध विभागांच्या मंत्रिपदावरून मुक्त करण्यात आले आणि गुरुवारी त्यांना ‘तृणमूल’मधून निलंबित करण्यात आले. ‘ईडी’ने शहरातील काही भागांतील त्यांच्या निवासस्थानातून कोटय़वधींची रोकड जप्त केल्यानंतर त्यांची एक जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी हिलाही अटक केली आहे.
कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोगाच्या शिफारशींनुसार, गट-क आणि ड प्रवर्ग कर्मचारी तसेच सरकारी, तसेच अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या भरतीतील कथित अनियमिततेची चौकशी करत आहे.
चॅटर्जी स्वत:च्या नशिबासाठी जबाबदार : तृणमूल
‘तृणमूल’ नेतृत्वाने त्यांच्या वकत्व्यावर आक्षेप घेत नमूद केले, की चॅटर्जी स्वत:च्या नशिबासाठी जबाबदार आहेत. तृणमूल काँग्रेसचे राज्य सरचिटणीस कुणाल घोष यांनी गुरुवारी म्हटले होते, की अटक झाल्यानंतर गेले काही दिवस त्यांनी मौन का राखले होते? त्याला न्यायालयात दाद मागून आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. या घोटाळय़ाशी पक्षाचा काहीही संबंध नाही.