सय्यद अली शाह गिलानी यांच्या कट्टरवादी हुर्रियत कॉन्फरन्सचा सदस्य फिरदौस अहमद शाह याला मिळालेली रक्कम आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासाठी पैसा पुरवणारे लोक यांच्यात परस्पर संबंध असल्याचे या हल्ल्याचा तपास करणाऱ्या संस्थांना आढळले आहे.
डेमोक्रॅटिक पॉलिटिकल मूव्हमेंटचा अध्यक्ष फिरदौस अहमद शाह याला २००७ ते २०१० दरम्यान तीन कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळाली होती, असे काश्मीर खोऱ्यातील मनी लाँडरिंग प्रकरणात अलीकडेच दाखल केलेल्या आरोपपत्रात सक्तवसुली संचालनालयाने म्हटले आहे.
इटलीतील मदिना ट्रेडिंगमार्फत मिळालेले हे पैसे पाकव्याप्त काश्मीरमधील जावेद इक्बाल याने पाठवल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र इटालियन पोलिसांनी २००९ मध्ये दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक केली असता असे आढळले की, इटलीत कधी पाऊलही न ठेवलेल्या इक्बालच्या नावाने या फर्मने सुमारे तीनशे वेळा पैसे पाठवले होते. ज्या लोकांची ओळखपत्रे किंवा पारपत्रे चोरण्यात आली होती, अशा निर्दोष आणि ज्यांच्यावर संशय येणार नाही अशा व्यक्तींची ओळख वापरून ब्रेसिका स्थित या कंपनीने अनेकदा पैसे हस्तांतरित केले, असे इटालियन पोलिसांनी तपासाअंती म्हटले होते. इक्बालच्या बाबतीत, एकतर त्याची ओळख लपवण्यात आली असावी किंवा त्याने पाकिस्तानमधील दुसऱ्या ‘मनी ट्रान्सफर एजन्सी’चा वापर केला असावा.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या तपासादरम्यान मदिना ट्रेडिंग कंपनीचे नाव पुढे आले होते. हल्ल्याच्या वेळेस ‘व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल’ (व्हॉइप) कार्यान्वित करण्यासाठी २२९ अमेरिकी डॉलर्सचा दुसरा हप्ता पावती क्रमांक ८३६४३०७७१६-० अन्वये ‘वेस्टर्न युनियन मनी ट्रान्सफर’च्या मदतीने ‘कॉलफोनेक्स’ला पाठवला होता. ही रक्कम जावेद इक्बालने पाठवली होती व ओळख पटवण्यासाठी त्याने केसी ०९२४८१ क्रमांकाच्या पाकिस्तानी पासपोर्टचा वापर केल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.
पैसे हस्तांतरणाच्या ३०० नोंदींची पडताळणी केली असता त्यातील रक्कम शाह व त्याचा साथीदार यार मोहम्मद खान याला थोडय़ा-थोडय़ा रकमेत पाठवण्यात आल्याचे आढळले. शाह आणि खान यांना वेस्टर्न युनियन मनी ट्रान्सफरच्या माध्यमातून इटलीतून पैसे मिळाले आणि ही रक्कम दहशतवादाला निधी पुरवण्याच्या वापरली गेली, असे श्रीनगरमधील विशेष सत्र न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा