Monkey Caused Power Grid Failure: रविवारी श्रीलंकेत निर्माण झालेली अभूतपूर्व स्थिती जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. सामान्यपणे आपण फिरायला वन्यभागात जातो तेव्हा तिथल्या माकडांचा उच्छाद आपल्यासाठी त्रासदायक ठरतो. पण हातातल्या वस्तू सांभाळून ठेवण्यापलीकडे आपल्याला फारशी काळजी घ्यावी लागत नाही. आपल्याला हुल देण्यापलीकडे या माकडांची मजलही जात नाही. पण श्रीलंकेत चक्क एका माकडामुळे आख्खा देश अंधारात गेल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. बीबीसीनं यासंदर्भातलं वृत्त दिलं असून या अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीच वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाची धावाधाव झाल्याचं पाहायला मिळालं.
नेमकं काय घडलं श्रीलंकेत?
श्रीलंकेत रविवारी देशभरातील वीजपुरवठा खंडित झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. सेंट्रल पॉवर ग्रीडमध्ये बिघाड झाल्यामुळे श्रीलंकेत बहुतांश भागात अंधार झाला. स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ वाजता देशाच्या अनेक भागात वीज गायब झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. पॉवर ग्रीडमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर येईपर्यंत जवळपास संपूर्ण देशातून या तक्रारी दाखल झाल्या. पुढचे जवळपास तीन तास हा खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी श्रीलंकेतील प्रशासन प्रयत्न करत होते.
ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं बिघाडाचं कारण!
दरम्यान, या सर्व प्रकाराबाबत प्रसारमाध्यमांनी विचारणा केली असता श्रीलंकेचे ऊर्जा मंत्री कुमारा जयकोडी यांनी या बिघाडामागचं नेमकं कारण सांगितलं. एक माकड उड्या मारता मारता सेंट्रल पॉवर ग्रीडच्या ट्रान्सफॉर्मरच्या संपर्कात आलं आणि वीज पुरवठ्यात असमतोल निर्माण झाला. कोलंबोच्या दक्षिण उपनगरांत असलेल्या सेंट्रल पॉवर ग्रीड ट्रान्सफॉर्मर परिसरात हा प्रकार घडला. परिणामी वीजपुरवठ्याची केंद्रीय यंत्रणाच बाधित झाल्यामुळे देशाच्या जवळपास सर्वच भागात वीजपुरवठा खंडित झाला.
प्रशासनानं झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी वेगाने पावलं उचलली. यासंदर्भात थेट केंद्रीय मंत्री जयकोडी स्वत: लक्ष घालून कामाबाबत आढावा घेत होते. तीन तासांनंतर काही भागातला वीजपुरवठा सुरळीत करण्यात वीज विभागाला यश आलं. पण सगळीकडची परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी बराच काळ लागला.
गेल्या काही काळात श्रीलंकेत अनेकदा वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार समोर आले आहेत. २०२२ साली आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत अनेक भागांत जवळपास काही महिने वीजपुरवठा बंद होता. या काळात पेट्रोल पंपही बंद होते. डिझेलचा पुरवठाही बंद करण्यात आला होता. त्यामुळे देशातील सर्व भागांत दिवसाचे १३ तास वीज कपात लागू करण्यात आली होती.