नवी दिल्ली : देशात ‘मंकिपॉक्स’चा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना संशयित रुग्णांची तातडीने तपासणी करण्याचा सल्ला सोमवारी दिला. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या. दुसरीकडे रविवारी दिल्लीत आढळून आलेल्या संशयिताला रोगाची लागण झाल्याचे चाचण्यांअंती स्पष्ट झाले असून त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा >>> गहाळ कागदपत्रांचा तपास करा! डॉक्टर बलात्कार, हत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश
संशयित तसेच पुष्टी झालेल्या रुग्णांसाठी विलगीकरणाची सुविधा उपलब्ध आहे का, याची पडताळणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. सोमवारी राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी नागरिकांमध्ये अनावश्यक भीती निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यासही सांगितले आहे. भारतात मंकीपॉक्सचा कोणताही नवीन रुग्ण आढळलेला नसून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे चंद्रा यांनी स्पष्ट केले. त्यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या तयारीचा आढावा तसेच रुग्णालयांमधील विलगीकरण सुविधा त्यासाठी आवश्यक असलेली रसद तसेच प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. राज्य आणि जिल्हा स्तरावरील एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या सर्वेक्षण पथकांना याकडे लक्ष्य केंद्रित करण्यास सांगण्यात आले आहे.
हेही वाचा >>> विमा हप्त्यांवरील जीएसटी कपात लांबणीवर; बैठकीत व्यापक सहमती, नोव्हेंबरमध्ये निर्णय अपेक्षित अर्थमंत्री
दरम्यान, रविवारी आढळून आलेल्या संशयित रुग्णाच्या चाचण्यांचे निष्कर्ष सोमवारी हाती आले. त्यातून अलिकडेच एमपॉक्सची साथ असलेल्या देशातून परतलेल्या या व्यक्तीला ‘वेस्ट आफ्रिकन क्लॅड -२’ या विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने ‘साथ’ जाहीर केलेला ‘क्लॅड १’ विषाणू आढळून आला नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.
महत्त्वाच्या सूचना
●सार्वजनिक आरोग्य यंत्रणेची सिद्धता तपासा
●‘एमपॉक्स’ आजाराबाबत जनजागृती करा
●रुग्णालयातील विलगीकरण कक्षांचा आढावा घ्या
●रुग्णांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी सज्ज राहा
●आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षित करा. जिल्हास्तरावर तयारीचा आढावा घ्या