मान्सून केरळमध्ये दाखल
तीस मे रोजी मान्सून येणार अशा बातम्या असतानाच मान्सूनने यंदाच्या वर्षी अंदाज चुकवले होते व आधीच कमी पावसाची शक्यता असताना मान्सून वेळेवर येणार की नाही या भीतीने सर्वाच्या तोंडचे पाणी पळाले होते, पण अखेर नैर्ऋत्य मान्सून केरळच्या किनाऱ्यावर आज दाखल झाला. निर्धारित तारखेपेक्षा चार दिवस विलंबाने मान्सूनचे आगमन झाले.
नैर्ऋत्य मान्सूनचे आगमन ५ जून रोजी झाले आहे, प्रत्यक्षात तो १ जूनला तरी येणे अपेक्षित होते, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. मान्सून दक्षिण अरबी समुद्रात पुढे सरकला असून त्याने लक्षद्वीप व केरळ तसेच कर्नाटक, तामिळनाडू तसेच बंगालच्या उपसागरातील आग्नेय भाग व मध्य तसेच ईशान्य भागात आगेकूच केली आहे. प्रदीर्घ काळ अडकलेली त्याची वाटचाल एकदम वेगात सुरू झाली आहे.
भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे, की मान्सूनची आगेकूच होण्यास परिस्थिती अनुकूल असून नैर्ऋत्य मान्सून कर्नाटक व तामिळनाडू तसेच रायलसीमा व किनारी आंध्र प्रदेशात तसेच ईशान्य भारतात पुढे सरकण्यास अनुकूल परिस्थिती आहे. येत्या ४८ तासात तो या सर्व भागात येईल.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून ३० मे रोजी येणे अपेक्षित होते पण तो श्रीलंकेकडेच अडकून पडलयामुळे त्याला विलंब झाला. मान्सून पुढे सरकरण्यास अनुकूल स्थिती नव्हती, ती कालपासूनच निर्माण झाली. दरम्यान, यावर्षी सरासरीच्या कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्राला आणखी वाट पाहावी लागणार
सध्याच्या मोसमी वाऱयांचा प्रवाह बळकट नाही. त्यामुळे मान्सून लगेच महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता कमी आहे. आणखी दोन दिवसांनंतर मान्सूनच्या पुढील वाटचालीबद्दल सांगता येईल, असे पुणे वेधशाळेने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा