नैऋत्य मोसमी मान्सूनचे केरळमध्ये वेळेवर आगमन झाल्यामुळे सर्वाना मोठा दिलासा मिळाला असून वीजतुटवडा आणि दुष्काळ परिस्थिती आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र, डेंग्यू आणि विषाणूंच्या संसर्गाचे (व्हायरल फिव्हर) आणि ‘एचवनएनवन’ तापाचेही काही रुग्ण आढळत असल्यामुळे राज्यभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या परिस्थितीस तोंड देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.
केरळ आणि लक्षद्वीपमध्ये मान्सूनच्या नियमित हंगामास प्रारंभ झाल्याचे भारतीय हवामान विभागाने शनिवारी जाहीर केले. येत्या काही दिवसांत चांगला पाऊस पडण्याचेही अनुमान त्यांनी वर्तविले आहे. केरळची अर्थव्यवस्था आणि पर्यावरण प्रामुख्याने पावसावरच बहुतांशी अवलंबून असते. अशा परिस्थितीत गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी पाऊस २५ टक्क्यांनी तर ईशान्य मोसमी पाऊस ३५ टक्क्यांनी कमी पडला. परिणामी राज्यातील जलविद्युत प्रकल्पांवर त्याचा विपरीत परिणाम होऊन राज्याला प्रचंड वीजटंचाईचा सामना करावा लागला.
आता पावसामुळे राज्यातील जलसाठे भरण्यास सुरुवात झाली असली तरी दररोज दीड तास भारनियमन अनिवार्य झाले आहे. येत्या १० जूनपर्यंत हीच परिस्थिती कायम राहण्याची चिन्हे असून इडुक्की व अन्य ठिकाणच्या सखल भागात चांगला पाऊस पडला तर आणि जलसाठय़ांमधील पाण्यात भरीव वाढ झाली तर त्यामध्ये सकारात्मक बदल होऊ शकेल, असे केरळ राज्य विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader