गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेला मान्सून अखेर भारतात दाखल झाला आहे. काहीवेळापूर्वीच मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याकडून करण्यात आली. हवामान अनुकूल राहिल्यास पुढच्या ३ ते ४ दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. यापूर्वी हवामान खात्याने मान्सूनचे केरळात आगमन होण्यास ९ जून उजाडणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. मात्र, त्याच्या एक दिवस आधीच मान्सूनचे आगमन झाले आहे.
यापूर्वी हवामानाचा अंदाज देणाऱ्या स्कायमेट या संस्थेने केरळात आणि कर्नाटकच्या किनारी भागात मान्सूनचा पाऊस पुन्हा सुरू झाल्याचे सांगितले होते. मात्र, या वृत्ताला भारतीय हवामान खात्याकडून दुजोरा मिळण्याची वाट सर्वजण पाहत होते. राज्यात बुधवारी दक्षिण कोकण व गोव्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता ‘आयएमडी’ने वर्तवली आहे. तर ९ ते ११ जून दरम्यान दक्षिण कोकण व गोव्यात बऱ्याच ठिकाणी, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळकर ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. पुण्यात बुधवारी दुपारनंतर वा संध्याकाळी काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडू शकेल. त्यानंतरही १३ जूनपर्यंत पुण्यात पावसाचा अंदाज आहे.