प्रचंड उकाडय़ाने उत्तरेकडील राज्यांसह देशातील जनता त्रस्त झालेली असून साऱ्यांच्याच नजरा केरळात दाखल होणाऱ्या मान्सूनकडे लागल्या आहेत. मात्र महासेन वादळ आणि एकूणच हवामानातील अनिश्चिततेमुळे यावर्षी मान्सूनचे वेळापत्रक बिघडल्याचे बोलले जात असून एक आठवडय़ानंतर मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्यातरी नागरिकांना गर्मीपासून दिलासा मिळण्याची शक्यता लांबली आहे.
सध्या तरी पाऊस वेळेवर येण्याची चिन्हे दिसत नसल्याचे भारतीय हवामान खात्याचे प्रमुख डी शिवनंदा पै यांनी स्पष्ट केले. बंगालच्या उपसागरात मान्सूनबाबत तीन दिवसांपूर्वी आश्वासक वातावरण दिसत होते. मात्र पावसाची निश्चित  चिन्हे दिसत नसल्याचे शास्रज्ञांचे म्हणणे आहे.
मान्सून केरळात ३ जून रोजी दाखल होईल, अशी आम्हाला अजूनही आशा आहे. भारताची अर्थव्यवस्था कृषीक्षेत्रावर आधारित असून पावसावर निर्भर आहे. याव़ेळी अंदमानमध्ये निर्धारित वेळेपेक्षा तीन दिवस आधी म्हणजे १७ मे रोजी पावसाने हजेरी लावली. १७ ते २० मेदरम्यान मान्सून पुढे सरकला, मात्र त्यात पुढे प्रगती झाली नसल्याचे राष्ट्रीय मध्यम अंतर हवामान खात्याच्या संचालिका स्वाती बासू यांनी स्पष्ट केले. दरम्यान, यंदा पाऊस समाधानकारक पडणार असल्याचा विश्वसही हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Story img Loader