पीटीआय, नवी दिल्ली
मान्सून संपूर्ण देशात पोहोचला असून अंदाज व्यक्त केलेल्या वेळेच्या सहा दिवस आधीच त्याची प्रगती झाली असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने मंगळवारी दिली. विशेष म्हणजे जूनच्या मध्यामध्ये मान्सूनचा वेग मंदावला असूनही तो लवकर संपूर्ण देशात पोहोचला आहे.हवामान विभागाने मंगळवारी एक निवेदन प्रसृत करून माहिती दिली की, ‘‘नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागांमध्ये प्रगती केली आहे. त्यामुळे मान्सूनने २ जुलैलाच संपूर्ण देश व्यापला आहे, सामान्यपणे ही तारीख ८ जुलै असायला हवी होती.’’
केरळ आणि ईशान्य भागात ३० मे रोजीच मान्सून दाखल झाला होता. केरळमध्ये दोन तर ईशान्य भारतात सहा दिवस आधी तो दाखल झाला होता. त्यानंतर तो महाराष्ट्रातून पुढे सरकला, पण त्यादरम्यान त्याचा जोर कमी झाला. त्यामुळे पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात पावसाची प्रतीक्षा करावी लागली. दरम्यान, आसाम, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड तसेच ईशान्येकडील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, भूस्खलन अशा घटना घडत आहेत.