नैर्ऋत्य मान्सून आज(शुक्रवार) केरळमध्ये दाखल झाला असून केरळसह लक्षद्वीप आणि उत्तर कर्नाटकच्या विविध भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मान्सून केरळनंतर सामान्यत: पाच-सहा दिवसांमध्ये महाराष्ट्रात दाखल होतो, त्या-त्या वेळच्या स्थितीनुसार तो लवकर किंवा विलंबाने पोहोचतो. मान्सून सामान्यत: ६-७ जूनच्या सुमारास महाराष्ट्रात दाखल होतो. परंतु, मान्सूनचे केरळातील आगमन लांबले गेल्याने महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याच आठवड्याभराचा कालावधी लागण्याचे अपेक्षित आहे.
गेल्या तीन-चार दिवसांत त्याच्या पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आणि तो या आठवडय़ाच्या सुरुवातीला केरळच्या उंबरठय़ावर येऊन पोहोचला. त्याने श्रीलंकेचा अर्धा भाग व्यापला. सध्या केरळ ते कर्नाटक या राज्यांलगत अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचा पट्टा होता. त्याचबरोबर मान्सून पुढे सरकण्याच्या दृष्टीने वाऱ्यांचा प्रवाससुद्धा अनुकूल होते. याचा परिमाण म्हणून आज मान्सून केरळात दाखल झाला आहे. आता महाराष्ट्रातील आगमन कधी होणार याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, देशाच्या अनेक भागात गेले दोन दिवस वादळी पावसाने हजेरी लावली. त्यात केरळ, कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, ओरिसा, पश्चिम बंगालचा हिमालयीन भाग, झारखंड, आसाम, ईशान्येकडील राज्ये, आंध्र प्रदेशचा किनारी भाग यांचा समावेश आहे. शनिवापर्यंत मान्सून ईशान्येकडील राज्यांमध्ये दाखल होईल, असेही वेधशाळेकडून सांगण्यात आले.