महत्त्वाची विधेयके संमत करता यावीत म्हणून सध्या सुरू असलेल्या अधिवेशनास मुदतवाढ देण्याचा विचार सरकार करीत आहे, अशी माहिती केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांनी दिली. महत्त्वाची विधेयके संमत करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. मात्र वारंवार त्यात खो घालण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे आणि त्यामुळेच विधेयकांच्या मंजुरीसाठी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याचा सरकारचा मनोदय आहे, असे नायडू यांनी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना स्पष्ट केले.
राष्ट्रीय न्यायिक नियुक्त्या आयोग विधेयक, अल्पवयीन गुन्हेगारांच्या न्यायप्रक्रियेविषयक विधेयक, ‘अ‍ॅप्रेंटिस सुधारणा विधेयक’, १२१वे घटनादुरुस्ती विधेयक, विमा सुधारणा विधेयक, कामगार कायदे सुधारणा विधेयक आणि संरक्षणविषयक कायदे सुधारणा विधेयक आदी विधेयके चालू अधिवेशनातच मंजूर व्हावीत असा सरकारचा प्रयत्न आहे.त्याच दृष्टीने शक्य त्या सर्व पर्यायांचा अवलंब सरकारकडून केला जात आहे. काँग्रेस पक्ष विधेयकांवर चर्चा करण्याऐवजी त्यापासून पळ काढू पाहत आहे, त्यामुळे सर्व भाजप खासदारांनी अधिवेशनास संपूर्ण वेळ हजेरी लावावी, असे आवाहनही नायडू यांनी संसदेतील भाजप खासदारांना केले. राज्यसभेतील आपल्या संख्याबळाचा काँग्रेस नकारात्मक पद्धतीने वापर करू पाहत आहे, मात्र त्याला बळी न पडता जनतेला दिलेली वचने पूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे, याचा विसर पडू देऊ नका, असे आवाहनही नायडू यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon session of parliament may get extended