गेल्या दोन दिवसांपासून मणिपूरमधील दोन महिलांनी नग्न धिंड काढण्याच्या मुद्द्यावरून देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या महिलांवर झालेल्या अत्याचाराबाबत राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी सोशल मीडियावर तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. सामाजिक व राजकीय जीवनाप्रमाणेच देशाच्या कायदेमंडळ सभागृहांमध्येही याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. या घटनेवरून संसदेत विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली असून केंद्र सरकार टीकेच्या केंद्रस्थानी आल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज विरोधकांनी लोकसभेत घातलेल्या गोंधळामुळे गृहमंत्री राजनाथ सिंह संतप्त झाले. यावेळी त्यांनी विरोधकांवरच गंभीर आरोप केला.
काय घडलं मणिपूरमध्ये?
गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये दोन सामाजिक गटांमध्ये हिंसाचाराच्या अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे मणिपूर अशांत झाल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्नी मणिपूरमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला. दोन महिलांची सुमारे ३० ते ४० पुरुष नग्न धिंड काढत असल्याचा हा व्हिडीओ होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाऊ लागली. हा व्हिडीओ आत्ताचा नसून दोन महिन्यांपूर्वी अर्थात ४ मे रोजीचा असल्याचं समोर आल्यानंतर तर केंद्र सरकार व मणिपूर सरकारच्या अकार्यक्षमतेवर सडकून टीका केली जाऊ लागली.
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या आधी माध्यमांशी बोलताना या घटनेवर तीव्र खेद व्यक्त केला. तसेच, संबधित दोषींवर कारवाई करण्याचाही उल्लेख केला. मात्र, घटना घडून गेल्यावर दोन महिन्यांनी पंतप्रधानांनी या गंभीर प्रकारावर भूमिका मांडल्यावरून विरोधकांनी पुन्हा सत्ताधारी भाजपाला व पंतप्रधानांना लक्ष्य केलं. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी लोकसभेत विरोधकांनी चर्चेची मागणी करत तुफान गदारोळ केला. हा गोंधळ इतका वाढला, की लोकसभेचं काम दुसऱ्या दिवशीही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
काय म्हणाले राजनाथ सिंह?
राजनाथ सिंह यांनी यासंदर्भात लोकसभेत बोलताना विरोधकांवरच गंभीर आरोप केला. “मणिपूरची घटना नक्कीच गंभीर आहे. या प्रकरणाचं गांभीर्य पाहाता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: हे सांगितलं आहे की मणिपूरमध्ये जे काही घडलंय, त्यामुळे संपूर्ण देशाला लाज वाटली आहे. मणिपूरमधील घटनांमध्ये कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. आमची इच्छा आहे की मणिपूरच्या घटनेवर संसदेत चर्चा व्हायला हवी”, असं राजनाथ सिंह म्हणाले.
“मी काल सर्वपक्षीय बैठकीतही हीच गोष्ट सांगितली आणि आज पुन्हा मी तीच बाब सांगतोय. पण मी बघतोय की काही राजकीय पक्ष इथे विनाकारण अशी स्थिती निर्माण करू पाहात आहेत जेणेकरून मणिपूरच्या घटनेवर चर्चा होऊ नये. मी स्पष्टपणे हा आरोप लावतोय, की विरोधी पक्ष मणिपूरमधील घटनेबाबत जेवढा गंभीर असायला हवा, तेवढा गंभीर नाही. ते मणिपूरच्या घटनेला गांभीर्याने घेतच नाहीये. त्यांनी या प्रकरणाला गांभीर्यानं घ्यावं”, असा आरोपच राजनाथ सिंह यांनी केला.
मणिपूरमध्ये महिलांना विवस्त्र करत अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीच्या घराला आग
गृहमंत्र्यांच्या या आरोपांनंतर विरोधी पक्ष अधिकच आक्रमकपणे घोषणाबाजी करू लागले. त्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.