सुमारे १७ अब्ज सूर्यांइतकी प्रखरता सामावलेल्या राक्षसी कृष्णविवराचा शोध लावल्याचा दावा खगोलतज्ज्ञांनी केला असून, पृथ्वीपासून २५ कोटी प्रकाशवर्षे दूर असलेल्या लहान आकाशगंगेमध्ये हे कृष्णविवर आहे. ‘एनजीसी १२७७’ या आकाशगंगेमध्ये हे कृष्णविवर आहे. या आकाशगंगेमधील उष्णतेपैकी १४ टक्केइतकी उष्णता या कृष्णविवरामुळे तयार झाली असून ती सर्वसामान्य कृष्णविवराच्या केवळ ०.१ इतकी आहे. मात्र तरीही १७ अब्ज सूर्यांइतकी उष्णता या कृष्णविवरामध्ये सामावली असल्याचे शास्त्रज्ञांना दिसून आले. या आकाशगंगेच्या अभ्यासामुळे कृष्णविवर तसेच आकाशगंगानिर्मितीचे पूर्वीचे आडाखे व सिद्धांत बदलून जाऊ शकतात, असा कयास टेक्सास विद्यापीठाच्या खगोलतज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
‘एनजीसी १२७७’ ही आकाशगंगा पृथ्वीच्या ‘मिल्की वे’ या आकाशगंगेहून आकाराने १० पटीने लहान आहे. तरीही त्यातील कृष्णविवर ११ पट मोठे आहे. विक्राळ कृष्णविवरांच्या आकाशगंगा या साधारणत: मोठय़ा आकाराच्या दिसतात, मात्र या आकाशगंगेने त्याबाबतही अपवाद दाखविला आहे. या प्रकारामुळे ही सर्वात विचित्र अशी आकाशगंगा बनली असल्याचे टेक्सास विद्यापीठाचे शास्त्रज्ञ कार्ल गेबहार्ड यांनी सांगितले. ही आकाशगंगा अभ्यासली जात आहे, कारण त्यामुळे कृष्णविवर आणि आकाशगंगा एकत्रितरीत्या कशा तयार आणि विस्तारित होतात, याची अचूक माहिती उपलब्ध होऊ शकेल. या प्रक्रियेबद्दल आजवर कमी संशोधन झाले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कृष्णविवरांच्या निर्मितीबाबत विविध सिद्धांत मांडले गेले आहेत. सध्या तीन सिद्धांत उपलब्ध आहेत, मात्र त्यातला कोणता प्रमाण मानावा याबाबत साशंकता आहे. अचूक तपशिलांची उपलब्धता आणि प्रदीर्घ काळ चालणारी संशोधन प्रक्रिया यांमुळे कृष्णविवरांचा अभ्यास करणे शास्त्रज्ञांपुढे आव्हान असते. टेक्सास विद्यापीठाच्या गटाने टेलिस्कोपद्वारे अद्याप ७०० ते ८०० आकाशगंगांचा अभ्यास केला आहे.
कसे होतात कृष्णविवर?
अतिप्रचंड गुरुत्वाकर्षण असलेल्या ताऱ्यांच्या स्फोटानंतर त्याच्या केंद्रस्थानी कृष्णविवराची निर्मिती होते. त्यामुळे या कृष्णविवरामधून कोणतीही गोष्ट बाहेर पडू शकत नाही. प्रकाशही कृष्णविवरामधून पुन्हा खेचला जातो. भौतिकशास्त्राचे कोणतेही नियम त्याला लागू होत नसल्यामुळे कृष्णविवर आणि त्यासंबंधीची माहिती ही परिपूर्ण झालेली नाही.