जेडीयूमध्ये सहभागी होऊन प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरु केली आहे. पक्षात येताच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांना थेट दुसऱ्या क्रमांकाचे नेतेपद बहाल केले आहे. नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांची जेडीयूच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नेमणूक केली आहे.

प्रशांत किशोर यांनी १६ सप्टेंबरमध्ये जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सहभाग नोंदवला होता. पाटणा येथूनच त्यांनी राजकारणास सुरुवात केली होती. त्यांना पक्षात मोठे पद दिले जाईल, हे त्याचवेळी बोलले जात होते. अपेक्षेप्रमाणे एका महिन्याच्या आत प्रशांत किशोर यांना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष करण्यात आले आहे.

२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रशांत किशोर हे नरेंद्र मोदी यांचे अत्यंत निकटवर्तीय होते. तीन दशकांनंतर केंद्रात भाजपाचे बहुमतातील सरकार स्थापण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती, असे मानले जाते. २०१४ नंतर राजकीय वर्तुळात त्यांच्या नावाची मोठी चर्चा सुरु झाली.

पडद्यामागे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या विजयाची पटकथा लिहिणारे प्रशांत किशोर लवकरच जेडीयू प्रमूख नितीश कुमार यांच्या जवळ गेले. २०१५ मध्ये ते जेडीयूसाठी निवडणूक रणनीतीकार झाले. इथेही त्यांना यश आले आणि बिहारमध्ये जेडीयू, आरजेडी आणि काँग्रेसच्या महाआघाडीला प्रचंड यश मिळाले. व्यावसायिक निवडणूक रणनीतीकाराच्या रुपात प्रशांत किशोर यांनी अनेक पक्षांना निवडणुकांदरम्यान मदत केली. २०१७च्या यूपी विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेससोबत काम केले. परंतु, येथे त्यांना अपयश आले.

Story img Loader