Delhi Woman : एक तरुणी तिच्या होणाऱ्या नवऱ्यासह वॉटर पार्कमध्ये गेली होती. मात्र तेथील झोपाळ्याचा स्टँड तुटल्याने तो खाली पडून या तरुणीचा मृत्यू झाला. तरुण आणि तरुणी दोघंही झुल्यावर होते. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा आणि शवविच्छेदन झाल्यानंतर तरुणीचा मृतदेह तिच्या कुटुंबाच्या ताब्यात दिला आहे. तसंच गुन्हा नोंद करुन प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

नेमकी कुठे घडली ही घटना?

तरुणीचा वॉटर पार्कमध्ये मृत्यू झाल्याची ही घटना दिल्लीलल्या कापसहेडा भागात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २४ वर्षीय तरुणी प्रियांका तिच्या कुटुंबासह चाणक्यपुरीतील विनय मार्ग या ठिकाणी असलेल्या सी-२, १६५ या ठिकाणी राहात होती. प्रियांका एका खासगी कंपनीत सेल्स मॅनेजर पदावर काम करत होती. तिचं लग्न फेब्रुवारी २०२६ मध्ये होणार होतं. तिच्या कुटुंबात तिचे आई वडील, एक बहीण आणि एक भाऊही आहेत. नजफगढ या ठिकाणी राहणाऱ्या निखीलशी प्रियांकाचं लग्न होणार होतं. हे दोघंही गुरुवारी (३ एप्रिल) वॉटर पार्कमध्ये गेले होते. त्यावेळी ही घटना घडली.

नेमकी काय घटना घडली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निखिल आणि प्रियांका दोघंही आधी कापसहेडा सीमेजवळ असलेल्या फन अँड फूड व्हिलेज या ठिकाणी पोहचले. संध्याकाळी ६ च्या सुमारास या दोघांनी वॉटर राईड घेतली. त्यानंतर दोघंही अॅम्युझमेंट पार्कमध्ये गेले. तिथे रोलर कोस्टर राईडसाठी हे दोघं गेले होते. या राईडमध्ये दोघंही बसले. मात्र झुला जेव्हा वरती गेला तेव्हा त्याचा स्टँड तुटला आणि प्रियांका थेट वरुन खाली कोसळली आणि गंभीर जखमी झाली. तिला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसंच ती पडल्याची माहिती निखिलने तिच्या कुटुंबाला दिली आणि पोलिसांनाही सांगितलं. निखिलने सांगितलेल्या घटनेनंतर या प्रकरणी पोलिसांनी जबाब नोंदवला आणि कारवाई सुरु केली. ANI ने हे वृत्त दिलं आहे.

प्रियांकाच्या भावाचा आरोप

प्रियांकाचा भाऊ मोहीतने आरोप केला आहे वॉटर पार्कमध्ये सुरक्षेचे निकष पाळले गेले नाहीत. प्रियांका वरुन कोसळल्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यासही उशी झाला त्यामुळे तिचा मृत्यू झाला. तसंच प्रियांकाचा मृत्यू झाल्यानंतर वॉटर पार्कचा एक भाग दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. जर अॅम्युझमेंट पार्कमधल्या रोलर कोस्टर आणि इतर राईड्सना दुरुस्तीची गरज होती तर मग त्याची तिकिट विक्री का करण्यात आली? असाही सवाल मोहीतने केला आहे.

प्रियांकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

दरम्यान या घटनेनंतर प्रियांकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रियांका आणि निखिल या दोघांचाही साखरपुडा झाला होता. फेब्रुवारी २०२६ मध्ये हे दोघंही लग्न करणार होते. तसंच प्रियांका ही अतिशय हुशार आणि कुटुंबाविषयी प्रेम, आपुलकी असणारी मुलगी होती असंही तिच्या कुटुंबियांनी सांगितलं.