चंद्रावरील पाण्याचा मुख्य स्रोत हा सूर्याकडून येणारे भारित कण म्हणजे सौरवात असावा असे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे.
मिशिगन विद्यापीठातील वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार चंद्राच्या अंधारात असलेल्या भागातील विवरात जे बर्फ आहे त्याला शीत सापळे म्हणतात. त्यात सौरवातामधून आलेले हायड्रोजन अणू असावेत. चंद्रावरील पाण्याच्या स्थिरीकरणाविषयी १९७० पर्यंत जे सिद्धांत मांडले होते त्यानुसार हायड्रोजनचे आयन (प्रोटॉन) सौरवाऱ्यातून येतात व नंतर ते चंद्राच्या पृष्ठभागावरील ऑक्सिजनशी संयोग पावतात. त्यातून पाणी किंवा हायड्रॉक्सिल संयुगे तयार होतात. त्यात हायड्रोजनचा एक अणू व ऑक्सिजनचा एक अणू असतो व त्याला ओएच असे म्हणतात. अपोलो यानाने चंद्रावरून आणलेल्या नमुन्यांचे अवरक्त वर्णपंक्तीमापन व वस्तुमान वर्णपंक्तीमापन पद्धतीने विश्लेषण केले असता त्यात हायड्रॉक्सिलचे अस्तित्व दिसून आले. हायड्रॉक्सिल हे संयुग तेथील विवरांमध्ये आढळते याचे कारण सौरवात हे आहे. त्यामुळे प्रोटॉनचे प्रत्यारोपण केले जाते, असे जिऑलॉजिकल सायन्सेसचे प्राध्यापक युक्सू झांग यांनी सांगितले. हायड्रॉक्सिल हे संयुग चंद्रावर मोठय़ा प्रमाणात पसरलेले आहे. ते बर्फाच्या किंवा द्रव पाण्याच्या स्वरूपात नाही जेणेकरून ते मानवी चंद्रमोहिमांच्यावेळी वापरता येईल.
यांग लि यू यांच्या मते याचा दुसरा अर्थ बुध ग्रह तसेच व्हेस्टा व इरॉस या सौरमालेतील लघुग्रहांवर पाणी त्या स्वरूपात असण्याची शक्यता आहे. या सौर घटकांच्या ठिकाणची स्थिती वेगळी असली तरी त्यांची पाणी निर्मितीची क्षमता आहे.
गेल्या पाच वर्षांत अंतराळयानांनी घेतलेली निरीक्षणे व अपोलो यानाने आणलेल्या नमुन्यांच्या आधारे चंद्र हा कोरडा असल्याचा समज धुडकावून लावला आहे.
२००९ मध्ये नासाच्या ल्युनर क्रॅटर ऑब्झर्वेशन अँड सेन्सिंग सॅटेलाईट चंद्रावरील अंधाऱ्या भागात असलेल्या विवरात अग्निबाण कोसळवण्यात आला होता त्यातून उठलेल्या धुळीचा अभ्यास केला असता त्यात बर्फाचा अंश सापडला. चंद्राचे खडक व पृष्ठभागावरही पाणी व त्यासंबंधीची संयुगे सापडली होती. तरीही चंद्रावरील पाण्याचा स्रोत नेमका माहीत नव्हता. हे संशोधन नेचर जिओसायन्स या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा