मोरबी (गुजरात) : गुजरातमधील मोरबी येथील दुर्घटनाग्रस्त झुलत्या पुलाची दुरुस्ती करणारे कंत्राटदार अशी कामे करण्यास पात्र नव्हते, असे फिर्यादी पक्षाने येथील न्यायालयात सांगितले. या पुलाच्या मार्गासाठी तळात अॅल्युमिनियमचा वापर करण्यात आला. मात्र, या बदलामुळे या पुलाचे वजन वाढले. परंतु त्याच्या तारा बदलण्यात आल्या नाहीत. जुन्या तारा एवढे वजन पेलण्यास सक्षम नसल्याने हा पूल तुटून कोसळला, असे फिर्यादी पक्षातर्फे न्यायालयात सांगण्यात आले. त्यासाठी न्यायिक वैद्यक अहवालाचा (फोरेन्सिक रिपोर्ट) संदर्भ देण्यात आला. रविवारी संध्याकाळी हा पूल कोसळून १३५ जण मृत्युमुखी पडले होते. मुख्य न्यायदंडाधिकारी एम. जे. खान यांनी अटक केलेले ओरेवा समूहाचे दोन व्यवस्थापक आणि पुलाची दुरुस्ती करणाऱ्या दोन उप-कंत्राटदारांना शनिवापर्यंत पोलिस कोठडी दिली. ‘ओरेवा’चे व्यवस्थापक दीपक पारेख, दिनेश दवे व उपकंत्राटदार प्रकाश परमार व देवांग परमार यांचा यात समावेश आहे. अन्य पाच जणांसाठी पोलिसांनी कोठडीची मागणी न केल्यामुळे न्यायालयाने सुरक्षारक्षक आणि तिकीट वितरण लिपिकासाह अटक केलेल्या पाच जणांना न्यायालयीन कोठडी दिल्याची माहिती सरकारी वकील एच. एस. पांचाळ यांनी दिली.
न्यायिक विज्ञान प्रयोगशाळेच्या (एफएसएल) अहवालाचा संदर्भ देत पांचाळ यांनी न्यायालयाला सांगितले, की या पुलाच्या तळातील मार्गासाठी वापरण्यात आलेल्या घटकांनी पुलाचे वजन वाढले. त्यामुळे पुलाची मुख्य तार तुटली. हा अहवाल बंद पाकिटातून सादर करण्यात आला. तरीही त्याचा संदर्भ देत या पुलाचे नूतनीकरणादरम्यान पुलाच्या तारा बदलण्यात आल्या नव्हत्या. दुरुस्ती करणारे दोन्ही कंत्राटदार हे काम करण्यासाठी पात्र नसल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले. असे असूनही या कंत्राटदारांना २००७ मध्ये व नंतर २०२२ मध्ये पूल दुरुस्तीचे काम देण्यात आले होते. त्यामुळे त्यांची निवड करण्याचे कारण काय होते आणि कोणाच्या सांगण्यावरून त्यांची निवड करण्यात आली, हे शोधण्यासाठी आरोपींना कोठडीची गरज असल्याचे फिर्यादी पक्षातर्फे सांगण्यात आले.
आरोपींचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय
मोरबी येथील वकील संघटनेने या पूल दुर्घटनेतील आरोपींचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला. या वकील संघटनेच्या सदस्यांनी बुधवारी निषेध मोर्चा काढला. ज्येष्ठ वकील ए. सी. प्रजापती यांनी सांगितले, की मोरबी बार असोसिएशन व राजकोट बार असोसिएशनने वकीलपत्र न घेण्याचा ठराव मंजूर केला. निष्पाप नागरिकांच्या मृत्यूने व्यथित होऊन नैतिकतेच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, हमजा लकडवा यांनी या निर्णयाला विरोध करताना सांगितले, की जातपंचायतीसारखे वागून बहिष्कार घातला जात आहे.
गुजरातमध्ये राज्यव्यापी शोक..
या दुर्घटनेबद्दल बुधवारी गुजरातमध्ये राज्यव्यापी शोक पाळण्यात आला. अहमदाबाद व सुरतच्या नागरी संस्थांनी मोरबी पूल दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोक सभा आयोजित केली होती. अहमदाबाद महापालिकेने आयोजित केलेल्या शोकसभेला मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही उपस्थित होते. गांधीनगरमधील राज्य सचिवालयासह सर्व सरकारी कार्यालयांत झेंडे अर्ध्यावर होते. बुधवारी कोणताही अधिकृत किंवा मनोरंजनाचा कार्यक्रम झाला नाही. राज्यात ठिकठिकाणी श्रद्धांली सभा आयोजित केल्या होत्या. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यव्यापी शोक पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता.