डेहराडून/ जोशीमठ : भूस्खलनग्रस्त जोशीमठ येथील आणखी दोन हॉटेल्स धोकादायकरीत्या एकमेकांकडे झुकत असून, रविवारी औली रोपवेनजीक व जोशीमठच्या इतर भागांमध्ये आणखी मोठे तडे पडले आहेत.
तडे गेलेल्या घरांची संख्या वाढून ८२६ झाली असून त्यापैकी १६५ घरे ‘असुरक्षित भागात’ आहेत, असे आपदा व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वार्तापत्रात म्हटले आहे. आतापर्यंत २३३ कुटुंबांना तात्पुरत्या मदत केंद्रांमध्ये हलवण्यात आले आहे.
यापूर्वी असुरक्षित घोषित करण्यात आलेल्या ‘मलारी इन’ व ‘माउंट व्ह्यू’ ही दोन हॉटेल्स पाडण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. या ठिकाणापासून सुमारे १०० मीटर अंतरावरील ‘स्नो क्रेस्ट’ व ‘कॉमेट’ ही दोन हॉटेल्स धोकादायकरीत्या एकमेकांकडे झुकलेली आहेत आणि खबरदारीचा उपाय म्हणून ती रिकामी करण्यात आली आहेत.
‘या दोन हॉटेल्समधील अंतर पूर्वी सुमारे चार फूट होते, मात्र आता ते काही इंचांपुरते असून, त्यांचे छत जवळजवळ एकमेकांना स्पर्श करत आहेत’, असे स्नो क्रेस्टच्या मालकाची मुलगी पूजा प्रजापती यांनी सांगितले
आज सुनावणी
नवी दिल्ली : उत्तराखंडच्या जोशीमठमधील संकट ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यासाठी न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज, सोमवारी सुनावणी करणार आहे.