गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना व्हिसा नाकारण्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना एका पत्राद्वारे मागणी करणाऱ्या संसदेच्या ६५ सदस्यांपैकी नऊ सदस्यांनी अशा कुठल्याही पत्रावर आपण स्वाक्षरी केली नसल्याचा दावा केला आहे. लोकसभेतील महाराष्ट्राचे खासदार जयवंतराव आवळे, मारोतराव कोवासे, संजीव नाईक तसेच राज्यसभा सदस्य वंदना चव्हाण यांच्याही स्वाक्षऱ्या बनावट असल्याचे म्हटले जात आहे. माकपचे राज्यसभेतील गटनेते सीताराम येचुरी यांनी त्या पत्रावरील स्वाक्षरी आपली
नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर ही बाब उजेडात आली आहे.
लोकसभा अध्यक्ष मीराकुमार यांनी खासदारांच्या बनावट स्वाक्षऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे झारखंडचे खासदार सुदर्शन भगत यांनी केली आहे, तर देशातील राजकीय आघाडीवर मोदींना रोखता येत नसल्यामुळे अमेरिकेच्या तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात येत आहे काय, असा सवाल ट्विटरवर भाजपच्या प्रवक्त्या निर्मला सीतारामन यांनी केला आहे. हा कट आणि पेस्टचा प्रकार आहे, असा संशय भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला आहे.
या वादामुळे मोदींना विनाकारण सहानुभूती मिळत असल्याचे लक्षात येताच काँग्रेसने बचावाचा पवित्रा घेतला. मोदींना व्हिसा द्यायचा की नाही, याचा निर्णय अमेरिकेला करायचा आहे. या प्रकरणाशी आमचे काही देणेघेणे नाही, असे मोदींना नेहमी लक्ष्य करणारे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. मोदींना विरोध करण्यासाठी ओबामा यांना पत्र लिहिण्याचा निर्णय काँग्रेसच्या राजकीय वा संसदीय व्यासपीठावर घेण्यात आलेला नव्हता, असे काँग्रेसचे प्रवक्ते राज बब्बर यांनी सांगितले. समाजात फूट पाडणाऱ्या मोदींच्या राजकारणाला तीव्र विरोध करणाऱ्या माकपने यापूर्वीही व्हिसा नाकारण्याच्या अमेरिकेच्या भूमिकेवर टीका करीत एका राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मोदींचे समर्थन केले होते.
एखाद्या देशाच्या सार्वभौमत्वाच्या कक्षेत येणाऱ्या मुद्दय़ावर काही टिप्पणी करणे आपल्या वा आपल्या पक्षाच्या धोरणांमध्ये बसत नसल्याचे मत येचुरी यांनी व्यक्त केले. या पत्रासाठी उत्तर प्रदेशचे राज्यसभेतील अपक्ष सदस्य मोहम्मद अदिब यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी मात्र येचुरी यांचा दावा खोडून काढला आहे. येचुरींनी आपल्यादेखत राज्यसभेत त्या पत्रावर सही केली होती, असे अदिब यांनी सांगितले.
गेल्या वर्षी गुजरात विधानसभेची निवडणूक सुरू असताना लोकसभेच्या ४० आणि राज्यसभेच्या २५ खासदारांनी बराक ओबामा यांना पत्र लिहून मानवाधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या मोदी यांना अमेरिकेने व्हिसा नाकारावा, अशी पत्रे लिहून मागणी केली होती.