Encounters in Uttar Pradesh : कुप्रसिद्ध गँगस्टर अतिक अहमद याचा मुलगा असद अहमद याचा झाशीमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांच्या चकमकीत खात्मा झाला आहे. त्यासोबतच, शूटर गुलामसुद्धा या चकमकीत ठार झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात चकमकींचे प्रकार वाढले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत जवळपास राज्यात १० हजार चकमकींची नोंद करण्यात आली आहे. तर, अशा चकमकीत ठार झालेल्यांची संख्या १८२ झाली आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १० हजारांहून अधिक पोलीस चकमकींची नोंद झाली आहे. राज्यात गेल्या सहा वर्षांत आतापर्यंत १० हजार ७१४ चकमकी झाल्या. अशा चकमकींमध्ये ठार झालेल्यांवर गंभीर गुन्हे दाखल होते.
उत्तर प्रदेशातील जिल्हावार आकडेवारी पाहता मेरठ पोलिसांनी सर्वाधिक ३ हजार १५२ चकमकी केल्या आहेत. यामध्ये ६३ आरोपींचा खात्मा करण्यात आला, तर १ हजार ७०८ जखमी झाले. या घटनांदरम्यान, या चकमकींमध्ये एका पोलिसाचा मृत्यू झाला, तर ४०१ पोलीस जखमी झाले आहेत. या चकमकींमुळे ५ हजार ९६७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा >> Asad Ahmed Encounter Case : ”आरोपींना जिवंत पकडण्याचा प्रयत्न, पण…”; पोलिसांनी सांगितलं एन्काऊंटरमागचं नेमकं कारण
मेरठपाठोपाठ आग्र्यात सर्वाधिक चकमकी झाल्या आहेत. येथे १ हजार ८४४ चकमकी झाल्या असून यामध्ये पोलिसांनी १४ आरोपींना मारले आहे. तर, यामुळे ४ हजार ६५४ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. यात एकूण ५५ पोलीस जखमी झाले आहेत.
बरेलीमध्येही १ हजार ४९७ चकमकींची नोंद झाली आहे. या चकमकींमध्ये सात आरोपी मारले गेले आहेत तर, ३ हजार ४१० आरोपींना पकडण्यात यश आले आहे. यातील एका चकमकीदरम्यान एक पोलीस शहीद झाले तर, २९६ पोलीस आणि ४३७ आरोपी जखमी झाले आहेत.
“योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून अनेक गुन्हेगारांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. मुख्यमंत्र्यांनी ‘असामाजिक कृत्यांविरोधात शून्य सहनशीलता धोरण’ आखले आहे, यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला प्राधान्य मिळाले आहे”, अशी प्रतिक्रिया विशेष पोलीस महासंचालक प्रशांक कुमार यांनी दिली.
हेही वाचा >> अतीक आणि अशरफ यांच्या सुनावणी दरम्यान दुसऱ्या मजल्यावरून डोकावणारी बुरखाधारी महिला कोण?
गेल्या वर्षभराची आकडेवारी पाहता (१६ मार्च २०२२ ते १५ मार्च २०२३) चकमकीत २३ आरोपी ठार झाले असून १२५६ आरोपी जखमी झाले आहेत. चकमक झाल्यानंतर केवळ आरोपींना ताब्यात घेण्याचं काम न करता त्यांच्याकडील साहित्यही जप्त केले जाते. या काळात १,८४९.२८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे.