हरियाणात झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी तेजीने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ५ जिल्ह्यांमध्ये ९३ गुन्हे दाखल करण्यात आले असून १७६ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, सरकारी जमिनीवर राहणाऱ्या स्थलांतरितांच्या झोपड्यांवर सरकारने बुलडोझर फिरवला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवत ही कारवाई करण्यात आली. तसंच, हिंसाचाप्रकरणी पोलीस अधिक्षक वरुण सिंगला यांचीही बदली करण्यात आली आहे.
तोरू येथील स्थलांतरितांच्या घरांवर बुलडोझर
हरियाणा सरकारने गुरुवारी सायंकाळी तोरू येथील सरकारी जमिनीवर अतिक्रमण केलेल्या स्थलांतरितांच्या २०० हून अधिक झोपड्यांवर बुलडोझर चालवला. हरियाणा नागरी विकास प्राधिकरणाच्या जमिनीवर ही कारवाई करण्यात आली. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. तसंच, नूह येथे नुकत्याच झालेल्या जातीय दंगलींमध्ये हे बेकायदेशीर रहिवासीही सहभागी असल्याचे तपासात समोर आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवत ही कारवाई करण्यात आली.
पोलीस अधिक्षकाची बदली
नूहचे एसपी वरूण सिंगला यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर नरेंद्र बिजारनिया यांना नियुक्त करण्यात आले आहे. वरुण सिंगला बृजमंडळ शोभायात्राआधीच सुट्टीवर गेले होते. शुक्रवारी देण्यात आलेल्या एका आदेशानुसार, पोलीस अधिक्षक वरुण सिंगला जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारादरम्यान सुट्टीवर गेले होते. त्यांची आता बदली करण्यात आली आहे. सिंगला यांची भिवानी पोलीस अधिक्षपदी बदली केली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) टी. वी. एस एन प्रसाद यांच्याद्वारे ३ ऑगस्ट रोजी हा सरकारी आदेश जारी करण्यात आला. यानुसार ,नरेंद्र बिजारनिया यांची सिंगला यांच्या जागेवर बदली करण्यात आली आहे.
हिंसाचार कायम
दरम्यान, हरियाणामध्ये शुक्रवारी सलग पाचव्या दिवशी तणाव कायम आहे. गुरुग्राममध्ये बुधवारी संध्याकाळी २५ ते ३० जणांच्या जमावाने दोन बंगाली मुस्लीम स्थलांतरितांना मारहाण केल्याची घटना समोर आली. तर नुह येथे एका मशिदीला आग लावण्यात आली. अन्य एका मशिदीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निसार अली आणि त्याचा भाऊ रुस्तम अली अशी मारहाण करण्यात आलेल्यांची नावे आहेत. निसार अली यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे. निसार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी ते आपल्या भावासह घरी जात होते. त्यावेळी चार ते पाच युवकांनी त्यांना आधी नाव विचारले आणि त्यानंतर मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर आणखी २० ते २५ युवकांचा जमाव आला आणि त्यांनीही निसार आणि रुस्तम यांना जबर मारहाण केली.