नवी दिल्ली : करोनाच्या साथीत अनेकांनी आपले आप्तजन गमावले. अनेक मुलांचे आई व बाबा असे दोन्ही या साथीत मरण पावल्याने ते अनाथ झाले असून या मुलांना मदत करण्यासाठी हजारो हात पुढे येत आहेत. पण आईबाबांची  छत्रछाया निघून गेल्याचे मोठे दु:ख त्यांना सोसावे लागत आहे. आईवडिलांच्या मृत्यूमुळे या मुलांचा भावनिक आधार गेला असून अनेकांचे आर्थिक पाठबळ कायमचे हिरावले गेले आहे, त्यामुळे त्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाच्या माहितीनुसार ३६२१ बालके अनाथ झाली असून  २६ हजार मुलांचे आई किंवा बाबा यांच्यापैकी एक कुणीतरी साथीत बळी पडले आहे. सात वर्षांच्या शताक्षी सिन्हाने सांगितले,की तिचे वडील गेल्या महिन्यात करोनाने वारले. आई कल्पना सिन्हा यांनी सांगितले,की आता आमची  घडी विस्कटली आहे. कारण माझे पतीच कुटुंबात कमावणारे एकमेव सदस्य होते. गौरांग  व दक्ष गुप्ता या दोन लहानग्यांची कथा याहून वेगळी नाही, ते उत्तम नगर येथे राहतात. त्यांच्या घरात वडील एकटेच कमावणारे होते जे करोनात मरण पावले. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती वाईट आहे. माझा लहान मुलगा वडील कुठे आहेत असे विचारतो पण माझ्याकडे उत्तर नाही, असे त्याची आई मधू  गुप्ता सांगते.  मुलांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले पण त्यात यश आले नाही असे त्यांनी सांगितले. यातील अनेक पालकांनी ‘बचपन बचाओ’ अभियानाशी संपर्क साधला आहे. आम्ही सरकारी अधिकाऱ्यांच्या संपर्कात   आहोत, असे या अभियानाचे संचालक मनीष शर्मा यांनी सांगितले.

दैनंदिन रुग्णसंख्या लाखाच्या खाली

देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ८० हजार ८३४ नवीन रुग्ण सापडले असून ७१ दिवसांतील ही नीचांकी संख्या आहे. सकारात्मकता दर हा ४.२५ टक्क्य़ांपर्यंत खाली आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. नवीन रुग्णांमुळे एकूण रुग्णसंख्या आता २ कोटी ९४ लाख ३९ हजार ९८९ झाली आहे. कोविड १९ मृत्यूंची संख्या ३ लाख ७० हजार ३८४ झाली असून ३३०३ इतके नवीन बळी गेले आहेत. उपचाराधीन रुग्णांची संख्या १० लाख २६ हजार १५९ झाली असून एकूण संसर्गाचे प्रमाण ३.४९ टक्के आहे. कोविडमधून बरे होण्याचा दर हा ९५.२६ टक्के राहिला आहे.

Story img Loader