नवी दिल्ली : करोनाच्या साथीत अनेकांनी आपले आप्तजन गमावले. अनेक मुलांचे आई व बाबा असे दोन्ही या साथीत मरण पावल्याने ते अनाथ झाले असून या मुलांना मदत करण्यासाठी हजारो हात पुढे येत आहेत. पण आईबाबांची छत्रछाया निघून गेल्याचे मोठे दु:ख त्यांना सोसावे लागत आहे. आईवडिलांच्या मृत्यूमुळे या मुलांचा भावनिक आधार गेला असून अनेकांचे आर्थिक पाठबळ कायमचे हिरावले गेले आहे, त्यामुळे त्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाच्या माहितीनुसार ३६२१ बालके अनाथ झाली असून २६ हजार मुलांचे आई किंवा बाबा यांच्यापैकी एक कुणीतरी साथीत बळी पडले आहे. सात वर्षांच्या शताक्षी सिन्हाने सांगितले,की तिचे वडील गेल्या महिन्यात करोनाने वारले. आई कल्पना सिन्हा यांनी सांगितले,की आता आमची घडी विस्कटली आहे. कारण माझे पतीच कुटुंबात कमावणारे एकमेव सदस्य होते. गौरांग व दक्ष गुप्ता या दोन लहानग्यांची कथा याहून वेगळी नाही, ते उत्तम नगर येथे राहतात. त्यांच्या घरात वडील एकटेच कमावणारे होते जे करोनात मरण पावले. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती वाईट आहे. माझा लहान मुलगा वडील कुठे आहेत असे विचारतो पण माझ्याकडे उत्तर नाही, असे त्याची आई मधू गुप्ता सांगते. मुलांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले पण त्यात यश आले नाही असे त्यांनी सांगितले. यातील अनेक पालकांनी ‘बचपन बचाओ’ अभियानाशी संपर्क साधला आहे. आम्ही सरकारी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत, असे या अभियानाचे संचालक मनीष शर्मा यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा