उत्तर प्रदेशमध्ये हवामान बदलामुळे विषाणूजन्य आजारांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी फिरोजाबादमध्ये डेंग्यूच्या तापामुळे १० दिवसात सुमारे ५३ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता राजधानी लखनऊमध्ये व्हायरल तापाचे रुग्ण वाढत आहेत. शहरातील विविध सरकारी रुग्णालयांमध्ये व्हायरल तापाचे तब्बल ४०० रुग्ण दाखल आहेत. त्यामध्ये ४० मुलांचाही समावेश आहे. ओपीडीमध्ये दाखल २० टक्के रुग्णांना ताप, सर्दी आणि नाक वाहण्याचा त्रास आहे. दरम्यान हा हंगामी फ्लू असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. परंतू तापाचे रुग्ण अचानक वाढल्याने रुग्णालयांमध्ये खाटा अपुऱ्या पडत आहेत.

रुग्णालयांमध्ये करोनाची अँटिजेन चाचणी घेतल्याशिवाय रुग्णांना ओपीडी विभागात घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यात व्हायरल तापाच्या रुग्णांची संख्या १५ टक्क्यांनी वाढली असून ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात तापामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५ टक्के होती. बलरामपूर हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटल आणि लोहिया इन्स्टिट्यूटमध्ये व्हायरल तापाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. ओपीडीमध्ये तापाचे ३०० रुग्ण आले आहेत. तर महानगर भाऊराव देवरस, राणी लक्ष्मीबाई, लोकबंधू, राम सागर मिश्रा आणि आरोग्य केंद्रांमध्येही तापाच्या बळींची संख्या सातत्याने वाढत आहे.

बालरोग विभागात १२ मुलांना दाखल करण्यात आले असून त्यापैकी ७ मुलं लखनऊमधील आहेत. लोहिया रुग्णालयातील औषध व बालरोग विभागाच्या ओपीडीमध्ये रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पॅथॉलॉजीमध्ये, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइडची चाचणी करवून घेणाऱ्या लोकांची संख्या सामान्यपेक्षा जास्त आहे. भाऊराव देवरस रुग्णालयातील १० खाटांचे बालरोग विभाग पूर्णपणे भरले आहे. दररोज ताप आलेली १० ते १५ मुलं रुग्णालयात येत आहेत, असं रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष यानी सांगितलं.

सिव्हिल हॉस्पिटलचे संचालक एसके नंदा यांनी इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले की “वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. वातावरणात आर्द्रता वाढली आहे, अशा परिस्थितीत वातावरणाच्या खालच्या पृष्ठभागावर विषाणू असतात. व्हायरल तापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून डेंग्यूचे देखील तीन रुग्ण दाखल आहेत. व्हायरल ताप आणि इतर रोगांच्या रुग्णांमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.”