More than 50 Countries Reached to Trump To begin Negotiations : व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय आर्थिक परिषदेचे संचालक केविन हॅसेट यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांचे समर्थन केलं आहे. तसंच, यामुळे अमेरिकेतली ग्राहकांवर मोठा परिणाम होणार असल्याचे दावेही फेटाळले आहेत. दरम्यान, वाढत्या आयात शुल्कावरून ५० हून अधिक देशांनी राष्ट्राध्यक्षांशी संपर्क साधला असल्याचंही ते म्हणाले. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
“मला काल रात्री एक अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये ५० हून अधिक देशांनी वाटाघाटी सुरू करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संपर्क साधला आहे. कारण, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादण्यात आले आहे”, असं केविन हॅसेट म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचं समर्थन करताना ते पुढे म्हणाले, मला वाटत नाही की अमेरिकेतील ग्राहकांवर मोठा परिणाम होऊ शकणार आहे. कारण आपल्याकडे दीर्घकालीन व्यापार तूट कायम राहण्याचे कारण या देशांतून पुरवठा फारच कमी राहिलेला आहे.
आयात शुल्कामुळे शेअर बाजार गडगडला
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (३१ मार्च) आयात शुल्क लागू केले. यामुळे काही देशांवर १० टक्के तर काही देशांवर ४० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लादण्यात आले आहे. डोनाल्ड ट्र्म्प यांच्या या घोषणेनंतर जगभरातील शेअर बाजार सातत्याने कोसळत राहिला. भारतातील शेअर बाजारातही मोठी घसरण पाहायला मिळाली. तर, अमेरिकेच्या शेअर बाजारातही गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.
दरम्यान, जे. पी. मॉर्गन यांनी २०२५ च्या अखेरिस अमेरिकेत मंदी येण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यासाठीच हे शुल्क आकारले गेले आहेत. अंदाजानुसार जीडीपीमध्ये घट आणि बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनीही चिंता व्यक्त केली आणि या शुल्कांमुळे महागाई वाढू शकते आणि विकास मंदावू शकतो.