ISKCON Bangladesh : बांग्लादेशात सध्या इस्कॉनवरून मोठा गोंधळ सुरू आहे. अशात, भारतात येणाऱ्या इस्कॉनच्या ५० हून अधिक सदस्यांना बांगलादेश प्रशासनाने रोखल्याचे वृत्त इस्कॉन कोलकातासह अनेक बांगलादेशी माध्यमांनी दिले आहे. सर्व वैध कागदपत्रे असूनही इस्कॉनच्या सदस्यांना भारतात प्रवेश करण्यापासून रोखल्याचे या माध्यमांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या वृत्तांमध्ये असा दावा केला की, इस्कॉनच्या ६३ सदस्यांना बांगलादेशी अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय सीमेपाशी बेनापोल बंदरावर संशयास्पद हालचालींमुळे रोखले.
“बांगलादेशातून आलेल्या बातम्यांनुसार, तेथिल विविध जिल्ह्यांतील इस्कॉनचे ६३ शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी सकाळी बेनापोल बंदरावर भारतात प्रवेश करण्यासाठी आले होते, परंतु संशयास्पद हालचालींमुळे त्यांना इमिग्रेशन पोलिसांनी रोखले,” असे टाईम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
काय म्हणाले बांगलादेशी पोलीस?
बांगलादेशी प्रसार माध्यमांना दिलेल्या वृत्तानुसार, इमिग्रेशन चेक-पोस्टचे अधिकारी इम्तियाज मोहम्मद अहसानुल म्हणाले की, “आम्ही ५४ बांगलादेशी प्रवाशांना त्यांच्या भारतात जाण्याच्या संशयास्पद हेतूंमुळे प्रवासाची परवानगी नाकारली आहे.” यावेळी इम्तियाज मोहम्मद अहसानुल प्रवास करण्यापासून रोखलेल्या इस्कॉनच्या इतर ९ सदस्यांचा उल्लेख केला नाही.
कशाच्या आधारावर नाकारली जात आहे?
इस्कॉन कोलकाताचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, “भारताच्या सीमेवर बांगलादेशी पोलिसांनी रोखलेले लोक, बांगलादेशच्या विविध भागातील इस्कॉनचे सदस्य होते. बांगलादेशातील परिस्थितीमुळे त्यांनी भारतातील तीर्थयात्रेसाठी येण्याचा निर्णय घेतला होता. परंतु बांगलादेशी पोलिसांनी शनिवारी ९ आणि रविवारी आणखी ५४ सदस्यांना सीमेवरच रोखले. वैध व्हिसा आणि इतर वैध कागदपत्रे असूनही त्यांना दुसऱ्या देशात जाण्याची परवानगी कशाच्या आधारावर नाकारली जात आहे?”
हे ही वाचा : मोदी सरकारने का ब्लॉक केले २८ हजार URL? १० हजार ‘यूआरएल’चा थेट खलिस्तानशी संबंध
बांगलादेशात सत्तातंर झाल्यापासून हिंदू अल्पसंख्याकांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बांगलादेशातील हिंदूंनी याविरोधात अनेकदा आंदोलने केली. नुकतेच चितगाव येथे झालेल्या आंदोलनादरम्यान बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करत चिन्मय कृष्ण दास यांच्यासह १९ जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी चिन्मय कृष्णा दास यांना अटक करण्यात आली होती. या अटकेच्या निषेधार्थ हिंसाचार झाला, ज्यात एका वकिलाचा मृत्यू झाला होता.