पाकिस्तानात लढाऊ जेट विमानांनी केलेल्या हल्ल्यात ५० अतिरेकी ठार झाले असून, त्यात उझबेक अतिरेक्यांचा समावेश आहे. शिवाय कराची विमानतळावरील हल्ल्याचा म्होरक्या यात मारला गेला असण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या लढाऊ जेट विमानांनी उत्तर वझिरीस्तानात दहशतवाद्यांच्या छावण्यांवर हल्ले केले. जेट विमानांनी उझबेक अतिरेक्यांचा अड्डा असलेले डेगन व दत्ताखेल भागात हल्ले केले. पहाटेच्या वेळी हे हल्ले करण्यात आले. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार शंभरपेक्षा जास्त दहशतवादी यात मारले गेले, पण त्याला दुजोरा मिळालेला नाही.
लष्कराच्या निवेदनात म्हटले आहे, की कराची विमानतळ हल्ल्याशी संबंधित दहशतवादी तिथे लपल्याची पक्की खबर लष्कराला मिळाली होती. किमान ५० अतिरेकी यात मारले गेले. त्यात बहुतांश उझबेक अतिरेकी होते, त्यांचा शस्त्रसाठाही नष्ट करण्यात आला. लष्करी सूत्रांच्या हवाल्याने ‘डॉन’ या वृत्तपत्राने म्हटले आहे, की गेल्या रविवारी कराची येथील जिना विमानतळावर झालेल्या हल्ल्यात सामील असलेले अतिरेकी यात मारले गेले.
या हल्ल्यात काही नागरिक महिला व मुलांसह मारले गेले. दहा उझबेक अतिरेक्यांनी जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला केला होता त्या वेळी तेरा तासांच्या धुमश्चक्रीत ३७ जण ठार झाले, तर १० दहशतवादी मारले गेले होते. विमानतळ हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाईसाठी दडपण वाढले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा