सौदी अरबसह मध्य पूर्व आशियात उष्णतेची लाट पसरली आहे. दरम्यान, हज यात्रेवरही (मक्का, सौदी अरब) उष्णतेच्या लाटेचा गंभीर परिणाम झाला आहे. तब्बल ५५० हज यात्रेकरुंचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. मृतांमधील ३२३ भाविक हे इजिप्तचे नागरिक होते. सौदी अरबमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं आहे की, या भाविकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे, तर एका व्यक्तीचा गर्दी चेंगरून मृत्यू झाला आहे. मक्केजवळील अल-मुसाइम येथील रुग्णालयाच्या शवागारातून मिळालेल्या माहितीनुसार उष्माघाताने ५५० हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.
इस्लाम धर्मामध्ये हज यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक मुस्लीम व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी हजला जायला हवं असं म्हटलं जातं. त्यामुळे जगभरातील लाखो मुस्लीम व्यक्ती दररोज हज यात्रेसाठी मक्केला जातात. दरम्यान, सौदीमधील हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हवामान बदलामुळे तिथल्या वातावरणावर गंभीर परिणाम होत आहेत. तसेच हज यात्रेवरही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. तिथलं सरासरी तापमान ०.४ अंशांनी वाढत आहे. सौदी राष्ट्रीय हवामान विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी मक्का येथील ग्रँड मशिदीच्या परिसरात ५१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
हे ही वाचा >> अमेरिकेच्या निर्बंधांवर मात करण्यास सहकार्य; युक्रेनमधील पाठिंब्याबाबत पुतीन यांच्याकडून उत्तर कोरियाचे आभारप्रदर्शन
हजसाठी मक्का शहरात आलेल्या ५५० भाविकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे, तर २,००० हून अधिक भाविकांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार चालू आहेत. मृतांची संख्या वाढू शकते, असं स्थानिक माध्यमांनी म्हटलं आहे. हज यात्रेकरून रांगेत उभे असताना सतत डोक्यावर पाणी ओतून घेत असल्याचं चित्र सोमवारी पहायला मिळालं. यात्रेकरूंना उन्हाचा कमीत कमी त्रास व्हावा यासाठी तिथले वॉलेन्टियर्स लोकांना पाणी, कोल्ड ड्रिंक्स, आईसक्रिम वाटत होते.
हे ही वाचा >> Bihar Bridge Collapse : १२ कोटींचा पूल बांधला, उद्घाटनाआधीच कोसळला; व्हिडीओ व्हायरल
हज व्यवस्थापन समितीने भाविकांना छत्रीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जास्तीत जास्त पाणी प्या, दुपारच्या वेळी बाहेर पडू नका, अशा सूचना देखील दिल्या आहेत. शनिवारी माऊंट अराफात येथे प्रार्थना आणि अनेक हज विधींसाठी यात्रेकरुंना दुपारच्या उन्हात थांबावं लागलं होतं. अनेक भाविक तासनतास तिथे उभे होते. त्यामुळे अनेकांची प्रकृती खालावली होती.