जम्मू-काश्मीर सध्या देशाच्या राजकारणातील केंद्रबिंदू ठरत आहे. दहशतवादी कारवायांवरून काँग्रेस आणि भाजपा एकमेकांवर आरोप करताना दिसत आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी एनडीए सरकार सत्तेवर आल्यापासून दहशतवाद विरोधी कारवाईला वेग आल्याचा दावा करत आकडेवारीच सादर केली आहे. भाजपा सत्तेवर आल्यापासून काश्मीर खोऱ्यात आतापर्यंत ६६० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा दावा प्रसाद यांनी केला आहे. काश्मीर खोऱ्यात लष्कराकडून राबवण्यात येत असलेल्या ऑपरेशनमध्ये दहशतवाद्यांपेक्षा सामान्य नागरिकांचा जास्त बळी जात असल्याचा आरोप आझाद यांनी केला होता. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबानेही आझाद यांच्या वक्तव्याला समर्थन देणारे पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे काँग्रेस सध्या अडचणीत आली आहे. आझाद यांच्या दाव्याला आता लष्कर ए तोयबाचे समर्थन मिळाले आहे, यावर काँग्रेसचे काय मत आहे, असा सवालही रवीशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेसच्या काळात अशा पद्धतीने कारवाई केली जात नव्हती असा आरोपही प्रसाद यांनी केला. प्रसाद म्हणाले, काँग्रेसच्या सत्ताकाळात वर्ष २०१२ मध्ये ७२, २०१३ मध्ये ६७ दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. तर भाजपा जेव्हा सत्तेवर आली तेव्हा २०१४ मध्ये ११०, २०१५ – १०८, २०१६-१५० आणि मे २०१८ पर्यंत ७५ दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले आहे. आता याची गुलामनबी आझाद यांनीच तुलना करावी, असे आव्हान त्यांनी दिले.

काय म्हणाले होते गुलामनबी आझाद
केंद्र सरकार दडपशाहीची निती अवलंबत असून याचे परिणाम सामान्य लोकांना भोगावे लागत आहेत. एका दहशतवाद्याला मारण्यासाठी १३ सामान्य नागरिकांचा बळी दिला जात असल्याचा गंभीर आरोप आझाद यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला होता. अलीकडच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास लष्कराची कारवाई ही नागरिकांवर जास्त आणि दहशतवाद्यांविरोधात कमी, असा आरोप केला होता.

Story img Loader