करोनाच्या संकटापासून मंगळवारी देशाला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात २५,१६६ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे जी गेल्या १५४ दिवसातील सर्वात कमी आकडेवारी आहे. यामुळे, एकूण प्रकरणांच्या तुलनेत सक्रिय रुग्णांची टक्केवारी झपाट्याने घटून केवळ १.१५ टक्के झाली आहे. सध्या देशात रिकव्हरी रेट ९७.५१ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, सोमवार देशात एका दिवसातील लसीकरणाचा उच्चांक गाठण्यात आला आहे.
भारताने सोमवारी ८८ लाखांहून अधिक करोनावरील लसीचे डोस देऊन लस एक दिवसातील लसीकरणाचा विक्रम गाठला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १६ ऑगस्टपर्यंत देशभरात करोना लसीचे ५५ कोटी ४७ लाख ३० हजार डोस देण्यात आले आहेत. सोमवारी ८८.१३ लाख लसी देण्यात आल्या. आतपर्यंत एका दिवसातील लसीकरणाच्या आकडेवारीतील ही सर्वात जास्त संख्या आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये २५,१६६ नवीन करोनबाधितांची नोंद झाली आहे. तर ४३७ करोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यापूर्वी १५ मार्च रोजी २४,४९२ रुग्णांची नोंद झाली होती. त्याचबरोबर, देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ३६,८३० लोक करोनामुक्त झाले आहेत.