लंडन : शब्दसंवादावर भर देणारे चर्चापीठ म्हणून लोकप्रिय असलेल्या ‘ट्विटर’ या समाजमाध्यमाशी थेट स्पर्धा करणारे ‘थ्रेड्स’ हे नवीन समाजमाध्यम फेसबुक, इन्स्टाग्रामची मालक कंपनी असलेल्या ‘मेटा’ने गुरुवारपासून कार्यान्वित केले. इलॉन मस्क यांच्याकडे मालकी गेल्यापासून ट्विटरवर वारंवार होत असलेल्या बदलांना त्रासलेल्या वापरकर्त्यांना आकर्षित करण्याचा ‘थ्रेड्स’चा प्रयत्न असून पहिल्या दिवशी अवघ्या १२ तासांत सव्वा दोन कोटी जणांनी या अॅपवर नोंदणी केली.
प्रथमदर्शनी ट्विटरसारखीच मांडणी असलेल्या ‘थ्रेड्स’चे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे त्यात एका पोस्टसाठी ५०० शब्दांची मर्यादा असणार आहे. ही शब्दमर्यादा ट्विटरवरील मर्यादेच्या जवळपास दुप्पट आहे. त्यासोबतच एका पोस्टमध्ये संकेतस्थळांच्या ‘लिंक’, छायाचित्रे आणि पाच मिनिटांपर्यंतच्या चित्रफिती जोडण्याची मुभा वापरकर्त्यांला असेल. या वैशिष्टय़ांमुळे ‘थ्रेड्स’ ट्विटरसमोर थेट आव्हान उभे करेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासून केलेली कामगार कपात, त्यावरील ओळख पडताळणीसाठीची मासिक शुल्क आकारणी तसेच पोस्टच्या संख्येवरील मर्यादा अशा निर्णयांमुळे ट्विटरची लोकप्रियता घटत चालली आहे. जाहिरातदारांनीही त्याकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. या परिस्थितीचा ‘थ्रेड्स’ला फायदा होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
थ्रेड्सचा इंटरफेस अतिशय साधा असून त्यामध्ये ट्विटरसारखी व्यक्तिगत संदेश देवाणघेवाण करण्याची सुविधा नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. गुरुवारी हे अॅप कार्यान्वित झाल्यानंतर भारतासह ब्रिटनमध्ये पोस्ट प्रदर्शित होण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या.
माहितीच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह
फेसबुक आणि इन्स्टाग्राम या अॅपप्रमाणेच थ्रेड्सदेखील वापरकर्त्यांची वैयक्तिक, आरोग्यविषयक तसेच आर्थिक तपशील, संपर्क क्रमांक, इंटरनेटवरील वापराचे तपशील आदी माहिती गोळा करत असल्याचे आढळून आले आहे. याशिवाय वापरकर्त्यांचे लोकेशन, खरेदीचे तपशील आणि अन्य संवेदनशील माहितीही हे अॅप गोळा करणार आहे. याच मुद्दय़ावरून ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सी यांनी या अॅपला टोला लगावला. ‘तुमच्या सगळय़ा नाडय़ा आमच्या हातात’ अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले.
युरोपात ‘थ्रेड्स’ नाही
युरोपीय महासंघाचे ‘डेटा’ गोपनीयतेविषयीचे नियम कठोर असल्याने सध्या हे अॅप युरोपीय देशांत सुरू करण्यात आलेले नाही. युरोपातील २७ देशांमध्ये हे अॅप नसेल, असे ‘मेटा’ने आयर्लंड येथील डेटा प्रायव्हसी कमिशनला कळवले आहे. जगभरातील १०० देशांत हे अॅप सुरू झाले आहे.