नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कथित गैरकारभारावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी ताशेरे ओढले. राज्याच्या प्रौढ लोकसंख्येपेक्षा नोंदणीकृत मतदारांची संख्या जास्त कशी असू शकते, असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला. तथ्यांच्या आधारावर प्रत्युत्तर देऊ असे प्रत्युत्तर निवडणूक आयोगाने दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रामध्ये ९.५४ कोटी प्रौढ लोकसंख्या असून मतदारांची संख्या मात्र ९.७ कोटी आहे, अशी माहिती राहुल गांधींनी दिली. ही आकडेवारी अनुक्रमे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व केंद्रीय निवडणूक आयोग यांनी प्रसिद्ध केली असल्याचा दावाही त्यांनी केला.

राज्याची प्रौढ लोकसंख्या म्हणजे मतदार असतील तर केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यापेक्षा जास्त मतदारांची संख्या आणली कुठून, असा सवाल राहुल गांधींनी केला. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे व शिवसेना-ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हेही उपस्थित होते. राज्यातील महाविकास आघाडीच्या वतीने या तीनही नेत्यांनी, मतदारयाद्यांमध्ये सामील करण्यात आलेले नवे मतदार व वगळण्यात आलेले मतदार या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संपूर्ण प्रक्रियेवर शंका उपस्थित केली.

अतिरिक्त मतदार?

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अतिरिक्त मतदारांना सामील करण्यात आल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला. २०१९ मधील विधानसभा निवडणूक व २०२४मधील लोकसभा निवडणूक या ५ वर्षांमध्ये ३२ लाख नवे मतदार सामील करण्यात आले. २०२४ मधील लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणूक या दोन्ही निवडणुकांमध्ये फक्त ५ महिन्यांचा कालावधी होता. या पाच महिन्यांमध्ये मात्र ३९ लाख नवे मतदार सामील केले गेले. पाच वर्षांमध्येही मतदार संख्येमध्ये जितकी वाढ झाली, त्यापेक्षाही अधिक मतदार ५ महिन्यांमध्ये सामील केले गेले. मतदारांमध्ये इतकी वाढ कशी होऊ शकते? ३९ लाख मतदार म्हणजे हिमाचल प्रदेशमधील संपूर्ण मतदारसंख्या होते. दोन निवडणुकांच्या कालावधीमध्ये अख्ख्या हिमाचल प्रदेशच्या मतदारांइतके मतदार महाराष्ट्रात वाढले का, असा मुद्दा राहुल गांधींनी मांडला.

कामठीबाबत दावा

विदर्भातील कामठी विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान ३५ हजार नवे मतदार सामील केले गेले. या मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवाराचे मताधिक्य नव्या मतदारसंख्येइतके आहे, असे राहुल गांधी म्हणाले. कामठीमधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्यातील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले, त्यांनी काँग्रेसच्या सुरेश भोयर यांचा पराभव केला. भाजप विजयी झालेल्या मतदारसंघांमध्ये अतिरिक्त मतदार सामील केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.

देशाच्या घटनात्मक संस्थांवर असे खोटे आरोप करून राहुल गांधी यांना काही लाभ होणार नाही. –किरेन रिजिजू, संसदीय कामकाजमंत्री

कामामुळे जनतेने महायुतीला कौल दिला आहे. राहुल यांच्या आरोपात जर तथ्य असते तर सर्वच ठिकाणी आम्ही विजयी झालो असतो. –भागवत कराड, खासदार, भाजप

आरोप बिनबुडाचे फडणवीस

दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पराभूत होणार आहे. या पराभवामुळे त्यांच्या पक्षाचे नाव दिल्लीतून पुसले जाईल. त्यामुळे अपयशावर पांघरूण घालण्यासाठी राहुल गांधींकडून आरोप केले जात आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीतील मतदानाची संपूर्ण आकडेवारी दिली आहे. त्यात कुठे किती मतदार वाढले हे सांगितले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी असे आरोप करण्यापेक्षा आत्मचिंतन करणे आवश्यक आहे असा टोला त्यांनी लगावला.

तथ्यांच्या आधारावर प्रत्युत्तर देऊ – आयोग

केंद्रीय निवडणूक आयोग राजकीय पक्षांना निवडणूक प्रक्रियेतील प्रमुख भागधारक मानतो. राजकीय पक्षांची मते, सूचना आणि प्रश्न यांना खूप महत्त्व देतो. आयोग देशभर एकसारखी प्रक्रिया राबवतो. त्याबाबत तथ्यांच्या आधारे लेखी स्वरूपात प्रतिसाद दिला जातो, असे निवेदन केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर तत्काळ प्रसिद्ध करण्यात आले.

संपूर्ण मतदारयादी, मतदारांची नावे, पत्ते व त्यांची छायाचित्रे उपलब्ध करून द्यावीत. केंद्रीय निवडणूक आयोगाने ही माहिती दिली नाही तर न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा पर्याय आहे. – राहुल गांधी, काँग्रेस नेते