मोरोक्कोच्या हाय अॅटल पर्वतीय भागात शुक्रवारी मध्यरात्री मोठा भूकंप झाला. या भूकंपात आतापर्यंत एक हजार नागरिकांचा मृत्यू झाला असून १२०० हून नागरिक जखमी झाले आहेत. या भूकंपात इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा मिनिटागणिक वाढत जातोय.
भूकंपाचा केंद्रबिंदू मोरोक्कोच्या मारकेश शहरापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, मारकेशपासून ३५० किलोमीटर अंतरावर असलेल्या राजधानी रबातमध्येही त्याचा प्रभाव जाणवला.
मोरोक्कन मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सर्वात प्रसिद्ध असलेल्या मारकेशमधील १२व्या शतकातील कौटुबिया मशिदीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, हा भूकंप फार भयंकर होता. क्षणार्धात भूकंपाचे धक्के जाणवल्याने रस्त्यावरील नागरिकांची पळापळ झाली. अचानक इमारती हलू लागल्या, जमिनीला भेगा पडल्या, प्रत्येकजण आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता. खालील व्हिडीओ पाहून हा भूकंप किती भीषण होता याची कल्पना येईल.
मोरोक्कोच्या भू-भौतिक केंद्राने सांगितले की, हाय अॅटलसच्या इघिल भागात रात्री ११ नंतर भूकंप झाला. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, १९६० पासून मोरोक्कोमधील हा सर्वात प्राणघातक भूकंप होता. १९६० साली झालेल्या भूकंपात जवळपास १२ हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता.
इघिल हा डोंगराळ प्रदेश असून येथे शेती केली जाते. मारकेशच्या नैऋत्येस सुमारे ७० किमी इघिल आहे. मोरोक्कोतील भूकंपात प्राण गमावलेल्या लोकांच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. ‘एक्स’ (ट्वीटर) अकाउंटवर पंतप्रधान मोदी म्हणाले, “मोरोक्कोतील भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली आहे. हे वृत्त ऐकून दु:ख झालं आहे. या दु:खद प्रसंगी माझ्या संवेदना मोरोक्कोतील लोकांबरोबर आहेत. या कठिण काळात मोरोक्काला सर्वोतोपरी मदत करण्यासाठी भारत तयार आहे.”